पितरांच्या स्मरणार्थ पिंडदानासाठी गोदाघाटावर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 05:51 PM2019-09-28T17:51:33+5:302019-09-28T17:54:22+5:30
भाद्रपद कृष्ण पक्षातील पितृपक्षाचा सर्वपित्री अमावास्येला समारोप होत असल्याने आपल्या पितरांचे स्मरण करून पिंडदान करण्यासाठी देशभरातील भाविकांनी शनिवारी (दि.२८) सकाळपासून गोदाघाटावर रामकुंड परिसरात गर्दी केली होती. ज्या पितरांच्या मृत्यूची तिथी निश्चित माहीत नसते, ज्यांचा आकस्मिक मृत्यू झालेला असतो अशा पितरांचा श्राद्धविधी आणि पिंडदान सर्वपित्री अमावास्येला करण्यात येत असल्याने शनिवारी पिंडदानासाठी रामकुंड परिसरात वेगवेगळ्या भागातील नागरिक पोहोचले होते.
नाशिक : भाद्रपद कृष्ण पक्षातील पितृपक्षाचा सर्वपित्री अमावास्येला समारोप होत असल्याने आपल्या पितरांचे स्मरण करून पिंडदान करण्यासाठी देशभरातील भाविकांनी शनिवारी (दि.२८) सकाळपासून गोदाघाटावर रामकुंड परिसरात गर्दी केली होती. ज्या पितरांच्या मृत्यूची तिथी निश्चित माहीत नसते, ज्यांचा आकस्मिक मृत्यू झालेला असतो अशा पितरांचा श्राद्धविधी आणि पिंडदान सर्वपित्री अमावास्येला करण्यात येत असल्याने शनिवारी पिंडदानासाठी रामकुंड परिसरात वेगवेगळ्या भागातील नागरिक पोहोचले होते.
रामकुंडाच्या उत्तरेला असलेल्या मंदिराच्या वरच्या बाजूला पिंडदानासाठी असलेल्या जागेवर पिंड ठेवण्यासाठी जागा मिळणे मुश्किल झाले होते. त्यामुळे काकस्पर्श झालेल्या पिंडावर दुसरे पिंड ठेवण्यात येत होते. पिंड ठेवल्यानंतर काकस्पर्शासाठी संबंधित व्यक्तीचे कुटुंबीय प्रतीक्षा करीत थांबून होते. ज्यांच्या पितरांच्या पिंडांना काकस्पर्श होत होता ते तेथून निघून जात होते. मात्र, काकस्पर्श लवकर होत नसल्याने भाविकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत होती. पंचवटी अमरधामजवळील स्मृतीवन उद्यानाच्या भिंतीवरही पिंडदान करण्यासाठी काही जणांची गर्दी झाली होती. या भागात वृक्षराजी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे येथे कावळ्यांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे येथे काकस्पर्श सहज होईल या भावनेने अनेक मृतांच्या कुटुंबीयांनी येथे पिंड ठेवले होते. दरम्यान, पूजाविधी आणि इतर खरेदी मोठ्या प्रमाणात होत असल्याने रामकुंड परिसरातील व्यावसायिकांनी पिंडदानासाठी आवश्यक साहित्याची उपलब्धता करून ठेवली होती. सर्वपित्री अमावास्येला रामकुंड परिसरात दरवर्षी उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणात येतात. सर्वपित्रीच्या निमित्ताने नाशिकला येणाऱ्या या भाविकांकडून रामकुंडावर स्नानासाठी पहाटेपासूनच गर्दी करून हजारोंच्या संख्येने पिंडदान व श्राद्धविधीसाठी गर्दी केल्याचे पहायला मिळाले.