निर्बंधात शिथिलता मिळताच बाजारपेठेत गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:12 AM2021-06-02T04:12:18+5:302021-06-02T04:12:18+5:30
सिन्नर : नाशिक जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ८.११ टक्के असल्याने सर्वच दुकाने उघडण्यास परवानगी मिळाल्याने व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. ...
सिन्नर : नाशिक जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ८.११ टक्के असल्याने सर्वच दुकाने उघडण्यास परवानगी मिळाल्याने व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. सर्वच दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ या काळात मंगळवारपासून सुरू झाल्याने बाजारपेठेत ग्राहकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेली दुकाने सुरू झाल्याने व्यावसायिकांना दिलासा मिळाला असला तरी, पूर्वीप्रमाणेच सावधगिरी बाळगून व्यवसाय करण्याची गरज आहे.
१२ ते २३ मेपर्यंत बारा दिवसांचा कडक लॉकडाऊन पाळल्यानंतर हळूहळू जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत गेली. लॉकडाऊननंतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्यात आली. या काळातही नागरिकांनी काळजी घेतल्याने ३१ मे रोजी नाशिक जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट ८.११ टक्के असल्याने काही निर्बंध शिथिल करून सर्वच दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे मंगळवारी सर्व दुकाने सुरू झाली. सकाळीच अनेकांनी दुकाने स्वच्छ करून व्यवसायाचा पुन्हा एकदा नव्याने श्रीगणेशा केला. त्यामुळे अर्थचक्राला गती मिळणार आहे.
किराणा, भाजीपाल्यासह भांडी, कापड, सलून, शू मार्ट, इलेक्ट्रीक, जनरल स्टोअर्स या दुकानांमध्ये गर्दी दिसून आली. दुपारी दोन वाजेपर्यंत दुकाने उघडी असल्याने सिन्नर शहरातील गणेशपेठ, सरस्वती पूल, वावीवेस, लाल चौक या भागात गर्दी दिसून आली. वाहनांची वर्दळही वाढल्याचे दिसून आले. गेल्या अनेक दिवसांपासून कापड, चप्पल, बूट, भांडी खरेदीसाठी अडकलेल्या नागरिकांनी दुकानात गर्दी केल्याचे दिसून आले. इलेक्ट्रॉनिक्स दुकानांतही अनेकांनी गर्दी केली होती. तथापि, खरेदी करताना सामाजिक अंतराची फारशी खबरदारी घेतली जात नसल्याचेही दिसून आले. नागरिक मास्क किंवा रुमाल तोंडाला बांधून बाहेर पडल्याचे दिसून आले. कोरोनाची तिसरी लाट येऊन पुन्हा लॉकडाऊन होऊ नये यासाठी दुकानदारांसह ग्राहक व नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
--------------------------
सिन्नर-नाशिक मार्गावर धावणार बस
अत्यावश्यक कामासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना सिन्नर-नाशिक अपडाऊन करता यावे यासाठी बुधवार (दि. २) पासून बससेवा सुरू करणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक भूषण सूर्यवंशी यांनी दिली. केवळ अत्यावश्यक कामासाठी जाणाऱ्या प्रवाशांनाच यात प्रवेश दिला जाणार आहे. सकाळी आठ, साडेआठ, सव्वानऊ आणि दुपारी दोन, चार, पाच वाजता सिन्नर-नाशिक बस सुटणार आहे. अत्यावश्यक कर्मचारी संख्या पाहून बससेवा सुरू राहील.
------------------------
खरेदीसाठी गर्दी
गेल्यावर्षी लॉकडाऊननंतर कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर दिवाळीच्या दरम्यान बससेवेसह खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती. नागरिकांनी कोरोना गेला म्हणत सर्वच निर्बंध झुगारून मुक्तसंचार सुरू केला होता. त्याचा परिणाम म्हणून कोरोनाने पुन्हा डोके वर काढले होते आणि दुसरी लाट आली होती. त्यामुळे अनलॉक झालेले व्यवसाय पुन्हा लॉक झाले होते. त्यामुळे जुना अनुभव लक्षात घेऊन आता निर्बंध शिथिल झाले असले तरी, सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. पुन्हा लॉकडाऊन होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे.
------------------------
सलून, कापड व्यावसायिकांना दिलासा
गेल्या अनेक दिवसांपासून कापड दुकाने व सलूनची दुकाने बंद होती. मंगळवारी सकाळी ७ वाजेपासून निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले. त्यामुळे कापड दुकाने व सलूनची दुकाने काेरोनाचे नियम पाळून सुरू करण्यात आली आहेत. सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी मिळाली आहेत. त्यामुळे व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.
-----------------------
सिन्नर येथे निर्बंधात थोडी शिथिलता मिळताच बाजारपेठेत गर्दी झाली होती. नागरिक दुचाकी घेऊन खरेदीसाठी बाजारपेठेत आल्याचे दिसून आले.
(०१ सिन्नर १)