रेल्वे आरक्षण केंद्रावर गर्दीने गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 10:02 PM2020-06-02T22:02:40+5:302020-06-03T00:17:18+5:30
नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानकात कोरोनाच्या काळात रद्द केलेल्या प्रवासी रेल्वेगाड्यांचे परतावा देण्याचे काम सुरू आहे. तसेच कोविड स्पेशल रेल्वे आरक्षण मुदत तीस दिवसांवरून १२० दिवस केल्याने सिन्नर फाटा येथील रेल्वे आरक्षण कार्यालयात प्रवाशाची गर्दी होत आहे.
नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानकात कोरोनाच्या काळात रद्द केलेल्या प्रवासी रेल्वेगाड्यांचे परतावा देण्याचे काम सुरू आहे. तसेच कोविड स्पेशल रेल्वे आरक्षण मुदत तीस दिवसांवरून १२० दिवस केल्याने सिन्नर फाटा येथील रेल्वे आरक्षण कार्यालयात प्रवाशाची गर्दी होत आहे. कर्मचारी व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे बोर्डाने जाहीर केलेले स्पेशल आपरेशन प्रोसिजर (एसओपी) हे कागदावरच असून पाळले जात नसल्याने करोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून गेल्या दोन महिन्यांपासून रेल्वे प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. परराज्यातील मजूर, कामगार व परप्रांतीयांना आपल्या गावी जाण्यासाठी काही श्रमिक रेल्वे सुरू करण्यात आल्या होत्या. एक जूनपासून संपूर्ण देशात दोनशे कोविड स्पेशल रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. दरम्यान, कोरोना काळात रद्द केलेल्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण तिकिटाचा परतावा देण्यास सुरुवात झाली असून, नाशिकरोडच्या प्लॅटफार्म क्रमांक चारवरील सिन्नरफाटा बाजूकडील आरक्षण कार्यालयात दोन खिडक्या उघडून आरक्षण रिफन्ड दिला जात आहे. तसेच स्पेशल रेल्वेचे आरक्षण तिकीटही दिले जात आहे.
२२ मार्च ते १४ एप्रिल दरम्यान रद्द झालेल्या रेल्वे आरक्षण तिकिटाचा परतावा १ ते ७ जूनपर्यंत देण्यात येणार आहे. तसेच प्रवासाच्या तारखेपासून पुढील सहा महिन्यांपर्यंत आरक्षण तिकिटाचा परतावा मिळणार आहे. कोविड स्पेशल रेल्वे आरक्षण मुदत तीस दिवसांवरून नुकतेच १२० दिवस करण्यात आली आहे. एकीकडे परताव्याची गर्दी तर दुसरीकडे आरक्षण तिकीट मुदत तीस दिवसांवरून १२० दिवस केल्याने त्या दोन्ही आरक्षण खिडकीवर गर्दी होत आहे.
-----------------
एसओपी कागदावरच; सुविधांची वाणवा
या काळात रेल्वे बोर्डाने रेल्वे कर्मचारी व प्रवासी यांच्या सुरक्षेसाठी स्पेशल आॅपरेशन प्रोसिजर (एसओपी) जाहीर केले आहे. त्यामध्ये कुठल्याप्रकारे सुरक्षेची काळजी घ्यावी याचे निर्देश दिले आहेत. प्रवाशांना आरक्षण खिडकीवर येताना मास्क घालून येणे, मार्किंगप्रमाणे उभे राहणे असे निर्देश आहेत. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना आरक्षण खिडकीबाहेरील प्रवाशांचे फिजिकल डिस्टन्स पाळण्याचे व त्यांचे तपमान घेण्याचे काम सोपविण्यात आले आहे.
-------------------------
शहरातील कार्यालय
सुरू करा
नाशिक शहर व परिसरातील रेल्वे प्रवासी हे सिन्नरफाटा येथील आरक्षण कार्यालयात रिफंड घेण्यासाठी व आरक्षण तिकीट घेण्यासाठी येतात. त्यामुळे त्या ठिकाणी प्रवाशांची गर्दी होत आहे. नाशिक शहरातील कॅनडा कार्नर व देवळाली कॅम्प स्थानकातील आरक्षण कार्यालय सुरू केल्यास सिन्नरफाटा आरक्षण कार्यालयावरील गर्दीचा भार हलका होईल. प्रवाशांनाही सोयीचे होईल. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने नाशिक व देवळाली आरक्षण कार्यालय सुरू करावे, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटना व प्रवाशांनी केली आहे.