निर्बंध शिथिल होताच रस्त्यावर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:16 AM2021-05-25T04:16:48+5:302021-05-25T04:16:48+5:30
कडक निर्बंध लावल्याने गेल्या दहा-बारा दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे आता सोमवारपासून घातलेले कडक निर्बंध ...
कडक निर्बंध लावल्याने गेल्या दहा-बारा दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे आता सोमवारपासून घातलेले कडक निर्बंध शिथिल करीत सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेची दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी दिली. सकाळी अकरापर्यंत किराणा दुकाने, भाजीपाला बाजार सुरू होता. किराणा दुकान उघडताच नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक महिला बाजारात आल्याने बिटको चौक, जेलरोड, दत्तमंदिर चौक येथे अधूनमधून वाहतूक कोंडी होत होती. किराणा आणि भाजीपाला, फळे, आदी जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने सकाळपासूनच घराबाहेर पडले होते.
आठवडाभर बंदोबस्त करणाऱ्या, पोलिसांनी थोडी विश्रांती घेतल्याचे दिसत होते. अकरा दिवसांच्या कडक लॉकडाऊनमुळे नाशिकरोडसह शहरात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. मात्र, पुन्हा लॉकडाऊन शिथिल झाल्याने रुग्णसंख्या वाढण्याचा धोका आहे. नागरिक, व्यावसायिकांनी स्वयंशिस्त, कोरोनाबाबतचे नियम पाळणे गरजेचे आहे. सकाळी अकरा वाजल्यानंतर किराणा दुकानदार व इतर अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांनी आपली दुकाने बंद करून घेतल्याने रस्त्यावरील गर्दी हळूहळू ओसरायला सुरुवात झाली होती. दुपारपासून हमरस्ते व गर्दीचे चौक निर्मनुष्य झाले होते. मे महिन्याच्या अखेरीपर्यंत स्वतःहून सर्वांनी कडक निर्बंध पाळले पाहिजे, असे बोलले जात आहे.