भाजीबाजारात गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:11 AM2021-07-10T04:11:56+5:302021-07-10T04:11:56+5:30
चिखलामुळे अडथळा नाशिक : पावसामुळे शहरातील काही रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे दुचाकी स्लीप होण्याचा धोका वाढला ...
चिखलामुळे अडथळा
नाशिक : पावसामुळे शहरातील काही रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे दुचाकी स्लीप होण्याचा धोका वाढला आहे. पायी जाणाऱ्या नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेने खोदलेल्या रस्त्यांमुळे ही स्थिती निर्माण झाल्याचा आरोप केला जात आहे.
सॅनिटायझर फवारणीकडे दुर्लक्ष
नाशिक : येथील बाजार समितीत सुरुवातीला प्रवेशद्वारावरच सॅनिटायझर फवारणीची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र नव्याचे नऊ दिवस संपताच पहिले पाडे सुरु झाले असून, आता सॅनिटायझर फवारणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. याशिवाय दुचाकीलाही थेट प्रवेश दिला जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो.
सोमेश्वर धबधबा कोरडाच
नाशिक : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी अद्याप सोमेश्वरजवळील धबधबा अद्याप खळाळून वाहिलेलाच नाही. धबधबा खळाळू लागल्यानंतर या ठिकाणी पर्यटकांची आणि शहरातील नागरिकांची मोठी गर्दी होत असते. मात्र जिल्ह्यात अद्याप जोरदार पाऊस न झाल्याने धबधबा अजूनही वाहू शकलेले नाही.
जॉगिंग ट्रॅकवर गर्दी
नाशिक : निर्बंध शिथिल झाल्यामुळे शहरातील जॉगिंग ट्रॅकवर सकाळी फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तपोवन रोड, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकसह छोट्या मोठ्या रस्त्यांवरही सकाळी फेरफटका मारताना नागरिक दिसून येत आहेत. ज्येष्ठ नागरिकांसह तरुणांचाही यात सहभाग वाढ आहे.