मतदार यादीत घोळ, प्रशासनाची दमछाक
By admin | Published: January 19, 2017 12:03 AM2017-01-19T00:03:47+5:302017-01-19T00:04:20+5:30
रात्रंदिन काम : दोन दिवसांत सुधारित करण्याचे आव्हान
नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभागनिहाय मतदार यादीतील गोंधळाबाबत एकूण ६८४ हरकती दाखल झाल्या आहेत. मतदार यादीतील हा घोळ मिटविताना मनपा कर्मचाऱ्यांची पुरती दमछाक होताना दिसून येत असून, दोन दिवसांत सुधारित मतदार यादी करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. त्यामुळे रात्रंदिवस कर्मचारी मुख्यालयात दुरुस्तीचे काम करत आहेत. येत्या २१ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार याद्यांचे विभाजन करत प्रारूप याद्या दि. १२ जानेवारीला प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यानंतर दि. १७ जानेवारीपर्यंत मतदार यादीसंबंधी हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. दरम्यान, दि. १७ जानेवारीपर्यंत महापालिकेच्या निवडणूक कक्षाकडे एकूण ६८४ हरकती दाखल झाल्या आहेत. प्राप्त हरकतींचा निपटारा करण्यासाठी सहाही विभागात उपआयुक्तांच्या नेतृत्वाखाली पथके तयार करण्यात आली असून, घरपट्टी वसुलीसाठी असलेल्या कर्मचाऱ्यांची मतदार यादीतील घोळ प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, मतदार यादीतील घोळ मिटविताना प्रशासनाची दमछाक होताना दिसून येत आहे.