दूषित पाण्याची अफवा असल्याची दवंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:51 AM2018-02-26T00:51:36+5:302018-02-26T00:51:36+5:30
गावाला दूषित पाण्याचा पुरवठा होतो म्हणून जिल्हा प्रशासनाने गटविकास अधिकाºयाला नोटीस बजावली असताना दुसरीकडे मात्र बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे ग्रामपंचायतीने दूषित पाण्याची अफवा असल्याची दवंडी दिल्याचा प्रकार रविवारी (दि. २५) घडला.
सटाणा : गावाला दूषित पाण्याचा पुरवठा होतो म्हणून जिल्हा प्रशासनाने गटविकास अधिकाºयाला नोटीस बजावली असताना दुसरीकडे मात्र बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे ग्रामपंचायतीने दूषित पाण्याची अफवा असल्याची दवंडी दिल्याचा प्रकार रविवारी (दि. २५) घडला. जिल्हा स्वच्छता व आरोग्य विभागाच्या वतीने दर महिन्याला सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीच्या पाण्याचे नमुने गोळा करण्यात येतात. जानेवारी २०१८ च्या अहवालानुसार जिल्ह्यातील ९ टक्के पाणी नमुने दूषित असल्याचे आढळून आले आहेत. या गंभीर प्रकाराकडे संबंधित अधिकाºयांनी दुर्लक्ष करून कर्तव्यात कसूर केल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिलेल्या नोटिसीत नमूद केले आहे. संबंधित ग्रामपंचायतीने पाणी शुद्धीकरणाबाबत वेळीच लक्ष न दिल्यास याला जबाबदार असलेल्या संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही म्हटले आहे. एकीकडे जिल्हा प्रशासन ग्रामस्थांना शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा आणि नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे म्हणून प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र डांगसौंदाणे ग्रामपंचायत आपल्या कारभारावर पांघरून घालण्यासाठी चक्क नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. रविवारी (दि.२५) सकाळी ७ वाजेच्या सुमारास सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेमधून गावाला पिण्यासाठी पाणी सोडण्यात आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने डांगसौंदाणे येथील पाणी दूषित आल्याचे जाहीर केले. पाणी असताना तेथील ग्रामपंचायत प्रशासनाने दवंडी पिटवून दूषित पाणी ही अफवा असल्याचा दावा करत नागरिकांनी पिण्याचे पाणी भरावे, असे आवाहन केले. संबंधित सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक असा दावा करून जिल्हा प्रशासनालाच खोटे ठरवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे बोबले जात आहे. जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन ग्रामपंचायत बरखास्त करून संबंधित सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकांविरु द्ध गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी माजी सरपंच कैलास बोरसे यांनी केली आहे.
१४० पाणी नमुने दूषित बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे येथील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीचे पाणीदेखील तीन महिन्यांपासून दूषित झाले आहे. जानेवारीत तपासण्यात आलेल्या १५०३ नमुन्यांपैकी १४० नमुने दूषित आल्याने बागलाणचे गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांना नोटीस बाजावण्यात आली आहे.