भांडण सोडविणाऱ्या युवकाचा निर्घृण खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 01:31 AM2019-01-29T01:31:27+5:302019-01-29T01:31:43+5:30
जेलरोड चंपानगरी भागातील एका उद्यानाजवळ सुरू असलेले भांडण मिटविण्यासाठी गेलेला रोहित प्रमोद वाघ याच्यावर टोळक्याने कोयत्याने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली. या हल्ल्यात वाघ याचे दोन मित्रदेखील गंभीर जखमी झाले आहेत.
नाशिकरोड : जेलरोड चंपानगरी भागातील एका उद्यानाजवळ सुरू असलेले भांडण मिटविण्यासाठी गेलेला रोहित प्रमोद वाघ याच्यावर टोळक्याने कोयत्याने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली. या हल्ल्यात वाघ याचे दोन मित्रदेखील गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चंपानगरी जेलरोड परिसरात रोहित हा आत्येबहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी रविवारी (दि.२८) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास आला होता.
यावेळी संशयित रोहित पारखे, करण केदारे, विशाल जाधव, सोनू गायकवाड, बाळा केदारे, ललित वागळे, मयूर गायकवाड, सागर गांगुर्डे, समाधान आव्हाड, अमित वाघमारे, आशिष वाघमारे यांचे चंपानगरी उद्यानाच्या जवळ आपापसांत भांडण सुरू होते. येथून जवळच रोहितच्या आत्येबहिणीच्या हळदीचा कार्यक्रम सुरू असल्यामुळे रोहित, रितेश, अल्केश हे तिघे त्यांना समजावण्यासाठी गेले. ‘येथे भांडण करू नका, हळदीचा कार्यक्रम आहे’ असे सांगितल्यानंतर संशयितांपैकी रोहित पारखे, करण केदारे यांनी या तिघा मित्रांवर सशस्त्र हल्ला चढविला. कोयत्याने रोहितच्या छातीवर वर्मी घाव लागला तर रितेश, अल्केश यांनाही दुखापत झाली. हल्ल्यानंतर संशयितांनी पळ काढला.
गोरेवाडी बनला गुन्हेगारांचा अड्डा
गेल्यावर्षी मंगलमूर्ती नगरमध्ये नातेवाईकांकडे आलेला कसारा येथील विद्यार्थ्याचा चेहरा एका सराईत गुन्हेगारासारखा साधर्म्यामुळे टोळक्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात त्या निष्पाप मुलाला प्राण गमवावे लागले होते. कॅनॉलरोड, मंगलमूर्तीनगर आदी काही जेलरोडमधील भाग सराईत गुन्हेगार, तडीपार गुंड यांचा अड्डा बनुन गेला आहे.
सहाजण अटकेत
खुनी हल्ल्यातील संशयित बाळा केदारे, ललित वागळे, सागर गांगुर्डे, अमित वाघमारे, विशाल जाधव, समाधान आव्हाड या सहा जणांना उपनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन सोमवारी अटक केली आहे. उर्वरित फरारी संशयितांचा पोलीस कसून शोध घेत आहे.