गोल्फ क्लबच्या विषयावरून रणकंदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 12:42 AM2018-09-20T00:42:44+5:302018-09-20T00:43:15+5:30
राज्य शासन व महापालिका यांच्या संयुक्त निधीमधून हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाच्या सुशोभीकरण, वाहनतळ, क्लॉक टॉवर उभारणी आदी सहा कोटी २७ लाखांच्या विकासकामांना विरोधी पक्षाने तीव्र आक्षेप घेत सभागृहात आंदोलन केले.
नाशिक : राज्य शासन व महापालिका यांच्या संयुक्त निधीमधून हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाच्या सुशोभीकरण, वाहनतळ, क्लॉक टॉवर उभारणी आदी सहा कोटी २७ लाखांच्या विकासकामांना विरोधी पक्षाने तीव्र आक्षेप घेत सभागृहात आंदोलन केले; मात्र भानसी यांनी त्यांच्या विरोधाला न जुमानता महासभेपुढे आलेल्या या विषयाला मंजुरी दिली. यावेळी सिडकोतील नगरसेवक मुकेश शहाणे यांनी पेलिकन पार्क सुधारणासाठी निधी मिळत नाही तोपर्यंत सभागृहात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने भाजपाची मोठी अडचण झाली.
यावेळी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सिडकोत थिमबेस क्रिडांगणासाठी असलेल्या दोन कोटी रुपयांचा निधी पेलिकन पार्कसाठी देण्याचे जाहीर केले. मात्र, त्यानंतरही शहाणे यांनी लेखी पत्र दिल्याशिवाय हटणार नाही अशी भूमिका घेतली. त्यांना सिडकोतील नगरसेवकांनी पाठिंबा दिला. मोठ्या मुश्किलीने भाजपा नेत्यांनी त्यांची समजूत काढली. दरम्यान, आमदार देवयानी फरांदे यांच्या निधीतून गोल्फ क्लब येथे सुशोभिकरण करण्याच्या कामासाठी शासनाचे पाच कोटी तर महापालिकेचे सहा कोटी २७ लाख रुपये देण्यावरून विरोधी पक्षाचे अजय बोरस्ते तसेच गजानन शेलार यांनी कडाडून विरोध केला. शासनाने पार्किंगसाठी दिलेला िनधी गोल्फ क्लबसाठी वळविण्याचे कारण काय? असा प्रश्न करीत महापालिकेत लुडबुड करणाऱ्या आमदार म्हणून फरांदे यांची हेटाळणी केली. तथापि सदरचा विषय मंजूर करण्यात आला.