‘आमदारस्नेही धोरणा’चे धक्कातंत्र
By admin | Published: January 17, 2016 12:28 AM2016-01-17T00:28:00+5:302016-01-17T00:28:56+5:30
दावेदारांना हुलकावणी : भाजपा शहराध्यक्षपदी बाळासाहेब सानप यांची नियुक्ती
नाशिक : राज्यात बहुतांशी ठिकाणी आमदारांनाच शहर आणि जिल्हाध्यक्षपद नियुक्तीच्या भूमिकेमुळे नाशिकमध्येही आमदार बाळासाहेब सानप यांच्या गळ्यात माळ पडली आहे. या धक्कातंत्रामुळे अनेक प्रबळ दावेदार मागे पडले आणि तीन वर्षांसाठी त्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले आहे.
पक्षाचे प्रदेश सरचिटणीस किशोर काळकर, निवडणूक अधिकारी संभाजीराव पगारे आणि उदय वाघ यांच्या उपस्थितीत या शहराध्यक्षपदाच्या उमेदवाराची शनिवारी घोषणा करण्यात आली. यापदासाठी माजी शहराध्यक्ष विजय साने, सुरेश पाटील आणि गोपाळ पाटील यांच्यासह अनेक जण इच्छुक होते. पक्षाने इच्छुकांची नावे शिफारस करणाऱ्या समितीने माहितीचे संकलन सुरू केल्यानंतर सानप यांनीही इच्छा प्रदर्शित केल्याने तसा अहवाल श्रेष्ठींकडे पाठविण्यात आला होता. मात्र, सानप यांनी आजवर भूषविलेली पदे आणि सध्याही ते अनेक सत्तापदांवर असल्याने त्यांचा विचार होईल अशी कोणाला फारशी खात्री नव्हती. उलट त्यानंतरही माजी शहराध्यक्ष विजय साने आणि सुरेश पाटील यांच्याच नावावर कार्यकर्त्यांकडून खल होत होता. शनिवारी दुपारी वसंतस्मृतीत पक्षाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तसेच अन्य प्रदेश कार्यकर्त्यांनी इच्छुकांची बैठक बोलवली होती. त्यानुसार अंतर्गत बैठकीत सानप यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झाले. नाराज झालेल्या गोपाळ पाटील यांनी प्रदेशाध्यक्षांचा निर्णय स्वीकारला असला तरी यापूर्वी पक्षात आपले म्हणणे ऐकले जात नव्हते आता तरी ऐकले जाईल, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे. सुमारे पाऊण तास चाललेल्या बंद दरवाजाआडील चर्चेनंतर पक्षाचे नेते बैठकीतून बाहेर आले. निवडणूक निरीक्षक संभाजीराव पगारे यांनी शहराध्यक्षपदी बाळासाहेब सानप यांच्या नावाची घोेषणा केली. यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी ढोलताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.