केंद्राने सर्वाधिक मदत देऊनही राज्य शासनाकडून ओरड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:14 AM2021-05-01T04:14:25+5:302021-05-01T04:14:25+5:30
नाशिक : केंद्र सरकारने राज्याला सर्वाधिक प्रमाणात ऑक्सिजन आणि रेमडेसिविरचा पुरवठा करण्यात आला आहे. त्याचे राज्य शासनाने योग्य नियोजन ...
नाशिक : केंद्र सरकारने राज्याला सर्वाधिक प्रमाणात ऑक्सिजन आणि रेमडेसिविरचा पुरवठा करण्यात आला आहे. त्याचे राज्य शासनाने योग्य नियोजन करून जिथे बाधित जास्त तिथे त्याचे वाटप अधिक होणे आवश्यक होते. मात्र, नाशिकला बाधित संख्या प्रचंड प्रमाणात असूनही पुरेशा प्रमाणात रेमडेसिविर आणि ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याची माहिती मिळाली आहे. नाशिकला मिळणारा कोटा अपुरा असल्याने तो वाढवण्याची गरज असल्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
नाशिकच्या जिल्हा रुग्णालयासह बिटको रुग्णालयास भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना फडणवीस यांनी केंद्र शासनाने गंभीर रुग्णसंख्या आणि मागणी या बाबीचा विचार करून सर्व राज्यांसाठी नियोजन केले असल्याचे सांगितले. लसींचे उत्पादन अधिक प्रमाणात करता यावे, यासाठी केंद्राने सीरमला ३ हजार कोटी, तर भारत बायोटेकला १,५०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यामुळे सीरम आता महिन्याला १० कोटी, तर भारत बायोटेक महिन्याला ६ कोटी लसींचे डोस तयार करू शकणार असल्याने राज्य शासनालादेखील मे महिन्यापासून पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होऊ शकणार असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. त्याशिवाय पंतप्रधान केअर फंडमधून नाशिकला ४ ऑक्सिजन प्लांट बसवले जाणार आहेत. मात्र, दरम्यानच्या काळात नाशिकला रुग्णांच्या वाढत्या संख्येनुसार ऑक्सिजन आणि रेमडेसिविरचा पुरवठा तात्काळ होण्याची आवश्यकता असून, त्यासाठी राज्य शासनाने नाशिकचा दोन्हींचा कोटा वाढवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. काही मंत्री आणि वजनदार नेते त्यांच्या जिल्ह्यात हे साठे पळवत असल्याचे आरोप होत असून, अशा मंत्र्यांना एकच विनंती आहे, त्यांनी जिथे जास्त बाधित आहेत, जिथे जास्त गरज आहे, अशा जिल्ह्यांकडेही लक्ष देण्याची गरज आहे. कारण मंत्री हे केवळ जिल्ह्यापुरते नसून संपूर्ण राज्याचे असतात, हे त्यांनी लक्षात ठेवणे आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
इन्फो
नाशिकला मिळणार २ ऑक्सिजन टँकर
नाशिकमधील रुग्ण बाधित होण्याचा दरदेखील ३० टक्क्यांवर गेला असून, हा रेट खूप अधिक आहे. त्यामुळेच नाशिकला अधिकाधिक रेमडेसिविर मिळावेत, यासाठीदेखील आम्ही प्रयत्न करीत आहोत, तसेच नाशिकला रिलायन्स आणि जिंदाल या कंपन्यांकडून २ ऑक्सिजन टँकर मिळण्याची व्यवस्था केली असल्याचेही फडणवीस यांनी नमूद केले, तसेच सद्य:स्थितीत राज्याने केवळ केंद्राकडे बोट दाखवण्याचे राजकारण न करता जनतेसाठी कार्य करावे, असेही फडणवीस यांनी नमूद केले.
इन्फो
त्याबाबत बोलायचे नाही
माझा नाशिक दौरा कदाचित जिल्हा प्रशासनाला माहिती नसल्याने मंत्र्यांनी बैठकीचे आयोजन केले असावे. मात्र, बैठकदेखील महत्त्वाची असल्याने माझी विभागीय आयुक्त आणि सिव्हिल सर्जनवगळता अन्य कुणाशी भेट होऊ शकली नाही. तरीदेखील त्याबाबत मला काहीही बाेलायचे नसल्याचे सांगून या शह-काटशहच्या राजकारणाबाबत बोलणे फडणवीस यांनी टाळले.