सीटी स्कॅन दीड वर्षापासून बंद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:14 AM2021-05-27T04:14:52+5:302021-05-27T04:14:52+5:30
नाशिक : कोरोना कालावधीत रुग्ण किती प्रमाणात बाधित आहेत हे समजण्यासाठी तसेच त्याला कोणत्या प्रकारचे उपचार लागतील त्यासाठी उपयुक्त ...
नाशिक : कोरोना कालावधीत रुग्ण किती प्रमाणात बाधित आहेत हे समजण्यासाठी तसेच त्याला कोणत्या प्रकारचे उपचार लागतील त्यासाठी उपयुक्त ठरणारी सीटी स्कॅन मशीन सुमारे दीड वर्षापूर्वीच कळवण उपजिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाली आहे. मात्र, कोरोनाच्या तीव्रतेची अचूक माहिती सांगू शकणारी ही सीटी स्कॅन मशीन गत दीड वर्षांपासूनच बंदच आहे.
नगरच्या जिल्हा रुग्णालयाला दोन वर्षांपूर्वीच नवीन सीटी स्कॅन मशीन प्राप्त झाले होते. त्यानंतर तेथील वापरात असलेले जुने सीटी स्कॅन मशीन शासन आदेशानुसार कळवण उपजिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाले होते. साधारणपणे कोरोनाच्या प्रारंभापूर्वीच हे यंत्र कळवणला आले होते. त्यामुळे कोरोनाला सुरुवात होत असताना ते मशीन दुरुस्त करून त्याचे इन्स्टॉलेशन करण्यात आले असते तर कळवण, देवळा, सटाणा, चांदवड आदी लगतच्या तालुक्यांमधील नागरिकांची सोय होऊ शकली असती. मात्र कोरोनाची दुसरी लाट संपत आली तरी ते मशीन अद्याप कार्यरत होऊ शकलेले नाही.
इन्फो
आता केवळ नाशिक, मालेगावचाच पर्याय
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपर्यंतही शासकीय रुग्णालयांपैकी केवळ नाशिक आणि मालेगाव रुग्णालयातच सीटी स्कॅन होते. तिथे प्रचंड रांगा लागत असल्याने नागरिकांना नाइलाजास्तव खासगी लॅबमध्ये जाऊन एचआरसीटी करावी लागत होती. शासकीय रुग्णालयांमध्ये सीटी स्कॅनच्या असलेल्या अपुऱ्या सुविधेचा फायदा खासगी लॅबचालकांनी घेतला. शासनाने अडीच हजार रुपयांचा दर निर्धारित करून दिलेला असतानाही खासगी लॅबचालकांनी कुठे पाच, कुठे सहा हजार रुपयांची आकारणी करीत नागरिकांची लूट केली.
इन्फो
रजिस्ट्रेशन, इन्स्टॉलेशन नाही
हे सीटी स्कॅन मशीन कळवणला दाखल झाल्यानंतर त्याचे पुन्हा रजिस्ट्रेशन आणि इन्स्टॉलेशन करावे लागते. त्याचे काम मुंबईच्या एका कंपनीकडे देण्यात आले होते. मात्र, त्या कामाला संबंधित कंपनीला गत दीड वर्षांपासून मुहूर्त मिळालेला नाही. तेथील डॉक्टरांना संबंधित कंपनीकडून असे सांगण्यात आले की, आता मशीन जुने झाले असल्याने त्याचे रजिस्ट्रेशन आणि इन्स्टॉलेशनदेखील करता येणार नाही. कंपनीचे म्हणणे खरे मानल्यास असे कालबाह्य मशीन मग कळवण उपजिल्हा रुग्णालयास कशासाठी पाठविण्यात आले, तसेच आता जर ते मशीन कालबाह्य झाले असेल तर वेळीच गतवर्षी ते का बसविण्यात आले नाही, असा सवालदेखील निर्माण झाला आहे.
--------------------------
(ही डमी आहे.)