काकडी २, तर शिमला मिरची ३ रुपये किलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:20 AM2021-08-19T04:20:31+5:302021-08-19T04:20:31+5:30
पंचवटी : गेल्या आठवड्यात पावसाने उघडीप दिल्याने शेतमालाला पोषक वातावरण निर्माण झाले होते. त्यातच बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या शेतमालाची ...
पंचवटी : गेल्या आठवड्यात पावसाने उघडीप दिल्याने शेतमालाला पोषक वातावरण निर्माण झाले होते. त्यातच बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने काकडी तसेच शिमला मिरचीचे बाजारभाव कोसळले. उत्पादन खर्चदेखील न सुटल्याने शेतकऱ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. बुधवारी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत काकडीच्या प्रतिक्रेटला ५०, तर शिमला मिरची ३० रुपये क्रेट दराने विक्री झाली.
आठवड्याभरापूर्वी पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे शेतमालाला पोषक वातावरण निर्माण झाले होते, परिणामी बाजार समितीत मोठ्या प्रमाणात काकडी व ढोबळी मिरचीची आवक झाल्याने बुधवारच्या दिवशी दुपारी झालेल्या लिलावात ढोबळी मिरची प्रतिकिलो तीन रुपये तर काकडी दोन रुपये किलो दराने विक्री झाल्याचे बाजार समिती सूत्रांनी सांगितले.
मंगळवारपासून रिपरिप पाऊस सुरू झाल्याने पावसामुळे शेतमाल खराब होण्याची दाट शक्यता निर्माण झाली. संततधार पावसामुळे पिकांना कीड लागण्याची शक्यता असल्याने काकडी, शिमला मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समितीत मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीला आणला. काकडी, शिमला मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने बाजारभाव घसरले. शेतकऱ्यांचा लागवड खर्च तसेच दळणवळण खर्चदेखील न सुटल्याने उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.