येवल्याच्या पूर्व उत्तर भागात पिके करपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 09:12 PM2018-08-11T21:12:53+5:302018-08-11T21:13:45+5:30
नगरसूल : येवला तालुक्यातील पूर्व उत्तर भाग हा दुष्काळसदृश बनला असून नगरसूल, राजापूर, पन्हाळे, खिर्डीसाठे, आहेरवाडी, लहित, जायदरे, हाडप सावरगाव, कुसुर, कुसमाडी, चांदगाव, नायगव्हाण, धामोडा, वाईबोथी, कोळगाव, ममदापूर, सायगाव, मातूलठाण आदी परिसरातील उभी पिके पाण्याअभावी करपली असून, जमिनीला भेगा पडल्या आहेत. या परिसरात मका, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, बाजरी ही पिके घेतली जात असून, पावसाने जास्त ओढ दिल्याने पिके करपली आहेत. मका, बाजरीच्या पिकांनी माना टाकल्या आहेत. या भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. विहिरी कोरड्या झाल्या आहेत. जवळपास बहुतेक शेतकऱ्यांनी स्वत:च्या विहिरीत टॅँकर टाकले असून ते पाणी संपले आहे. घरचा चारा कधीच संपला आहे. शेतकºयांपुढे चारा प्रश्न मोठा गंभीर बनला आहे. शासनाने कर्जमाफी केली ती अल्पशा प्रमाणात नियमाप्रमाणे कर्ज फेड करणाºया शेतकºयांच्या हातावर तुरी देऊन गाजर दाखविले. अनेक शेतकºयांना कर्जमाफीचा फायदा झाला नाही. घरातले काढून शेतात पेरले तेही पावसाअभावी जळून गेले जर दोन दिवसात पाऊस आला नाही तर परिस्थिती गंभीर बनेल. शासनाने तत्काळ दुष्काळ जाहीर करावा व या भागात टॅँकरने पाणीपुरवठा, जनावरांसाठी चारा छावण्या उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
येवला तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, जनावरांना तलाठी कार्यालयामार्फत चारा उपलब्ध करून द्यावा, वीजबिल माफ करा, कर्जमाफीतून सुटलेल्या शेतकºयांचे कर्ज माफ करावे. अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढू.
- सुभाष निकम, नगरसूल