पिकांची लागवड आली धोक्यात; मका, सोयाबीन पीक सुकण्यास सुरुवात, शेतकरी त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 04:04 PM2023-08-21T16:04:50+5:302023-08-21T16:05:07+5:30
यंदा बळीराजाला खरीप हंगामातील पिकांच्या मशागती व लागवडीसाठी भांडवलाची मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाली होती.
रोहन वावधाने
मानोरी,जि. नाशिक (रोहन वावधाने) : यंदा रिमझिम पावसाच्या भरवशावर झालेली खरीप हंगामातील मका, सोयाबीन, बाजरी आदी पिकांची लागवड अपुऱ्या पावसाअभावी धोक्यात आली असून उष्णतेत वाढ होत चालल्याने पीक सुकण्यास सुरुवात झाली असून पुढील पाच ते सहा दिवसांत दमदार पाऊस न पडल्यास खरीप हंगाम धोक्यात येणार असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला असल्याचे चित्र येवला तालुक्यातील ग्रामीण भागात दिसून येत आहे.
यंदा बळीराजाला खरीप हंगामातील पिकांच्या मशागती व लागवडीसाठी भांडवलाची मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाली होती. उसनवारी व उधारी करून बियाणे खतांची खरेदी बळीराजाने करून ठेवली होती; मात्र जून, जुलै महिन्याच्या सुरुवातीला देखील दमदार पावसाने पाठ फिरवल्याने रिमझिम पावसाचा आधार घेऊन जीव मुठीत धरून पिकांची पेरणी करण्याची नामुष्की बळीराजावर ओढवली होती.
यंदा बियाणे खतांच्या किमतीत वाढ झाल्याने खरीप हंगामातील मशागतीचा व बियाण्यांचा खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यात पावसाने महिनाभरापासून दडी मारल्याने पिके अधूनमधून पडणाऱ्या उष्णनेते होरपळून चालली असल्याचे देखील चित्र मानोरी, देशमाने, जळगाव नेऊर, पुरणगाव आदी परिसरात दिसून येत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडून पिकांना जीवदान देण्यासाठी स्प्रिंकलर द्वारे मका, सोयाबीन पिकांना पाणी देऊन पिके वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.
कांदा अनुदानाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा
यंदाच्या उन्हाळ्यात उष्णतेचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे विहीर, तळ्यामध्ये असलेला पाण्याचा साठा उष्णतेने मोठ्या प्रमाणात कमी झाला होता. मार्च महिन्यात राज्य सरकारने शेतकऱ्यांना कांद्याचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून शासनाने १५ ऑगस्टपर्यंत अनुदान देण्याची माहिती दिली असता १५ तारीख होऊन सहा दिवस उलटले असून अद्यापही शेतकऱ्यांना कांद्याचे अनुदान मिळाले नसल्याने शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे.
यंदा अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात खर्च करून देखील पावसाने ओढ दिल्याने उष्णतेने पिके सुकण्यास सुरुवात झाली आहे. शासनाने जाहीर केलेले कांद्याचे अनुदान शेतकऱ्यांना तत्काळ द्यावे. तसेच, टोमॅटोची निर्यात वाढवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. तसेच, दुष्काळी परिस्थिती बघून शेतकऱ्यांना दिलासा देऊन आधार देणे गरजेचे झाले आहे.
- संतोष मुळक, शेतकरी, निफाड.
पाऊस लांबल्याने पिके सुकण्यास सुरुवात झाली आहे. विहिरीत असलेले जलसाठे कोरडे झाले असून पिकांना दमदार पाऊस गरजेचा झाला आहे. पालखेड आवर्तनातून चाऱ्यांना पाणी सोडण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा पाऊस न झाल्यास पुढील काही दिवसांत पिके उघड्या डोळ्या समोर जळून जाणार आहे.
- विनायक भालके, शेतकरी, देशमाने.