गौरव दिनानिमित्त सांस्कृतिक शोभायात्रा
By admin | Published: August 9, 2015 11:44 PM2015-08-09T23:44:33+5:302015-08-09T23:45:08+5:30
गौरव दिनानिमित्त सांस्कृतिक शोभायात्रा
नाशिक : जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियानच्या वतीने रविवारी (दि़९) काढण्यात आलेल्या रॅलीमुळे शहरवासीयांना आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडले़ या रॅलीनंतर परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या हस्ते समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला़
‘बोगस हटाव-आदिवासी बचाव’, ‘आदिवासी जागा हो-संघर्षाचा धागा हो’, ‘वनवासी नही आदिवासी हैं’, ‘बिरसा मुंडा जिंदाबाद’, ‘पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा’ या मागणीच्या आशयाचे फलक घेऊन शेकडो आदिवासींनी रविवारी शहरातून रॅली काढली़ पंचवटीतील आऱ पी़ विद्यालयापासून सुरू झालेली ही रॅली निमाणी बसस्टॅण्ड, पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नलमार्गे परशुराम साईखेडकर नाट्यगृहात पोहोचली़
या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आदिवासी बांधवांनी बिरसा मुंडा, एकलव्य आदिंची वेशभूषा केली होती़ यातील काहीजण आदिवासी वाद्याच्या तालावर नृत्य करीत होते़ रॅलीचा समारोप परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झाला़
या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, नेट-सेट, पीएच.डी., नवोदित लेखक, कवी, सामाजिक कार्यकर्ते, दहावी-बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला़ कार्यक्रमास मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)