पत्की, चंद्रात्रे यांना संस्कृती वैभव पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:21 AM2018-12-24T00:21:02+5:302018-12-24T00:21:38+5:30
पूर्वीच्या काळात संगीताला मोठे महत्त्व दिले जायचे. त्यामुळे दिग्गज गायकही संगीतकारांच्या मदतीने दोनदा-तीनदा सराव केल्यानंतर ध्वनिमुद्रण करीत असत, परंतु नवीन पिढी अधिक उथळ झाली असून केवळ मुखडा गाण्यासाठी उभे राहतात.
नाशिक : पूर्वीच्या काळात संगीताला मोठे महत्त्व दिले जायचे. त्यामुळे दिग्गज गायकही संगीतकारांच्या मदतीने दोनदा-तीनदा सराव केल्यानंतर ध्वनिमुद्रण करीत असत, परंतु नवीन पिढी अधिक उथळ झाली असून केवळ मुखडा गाण्यासाठी उभे राहतात. तंत्रज्ञानामुळे अनावश्यक भाग काढून तो पुन्हा ध्वनिमुद्रित करता येतो, परंतु गायकाचे गीत पूर्ण होत नाही. त्यामुळे उत्कृष्ट निर्मिती होत नसल्याची खंत ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी व्यक्त केली.
संस्कृती वैभवतर्फे यंदा सुधीर फडके, ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त गोविंदनगर येथील त्रिवेणी महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी रविवारी (दि.२३) ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की व श्रीकृष्ण चंद्रात्रे यांना ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते संस्कृती वैभव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. मानपत्र, रोख रक्कम, शाल व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी श्रीकृष्ण चंद्रात्रे व अशोक पत्की यांच्याशी संवाद साधताना श्रीकृष्ण चंद्रात्रे यांना त्यांच्या मॉरिशस येथे रंगलेला लोकरामायण कार्यक्रम आणि आकाशवाणी व दूरदर्शनसह विविध कार्यक्रमांच्या यशस्वी प्रवासाविषयी बोलते केले. श्रीकृष्ण चंद्रात्रे यांनी आपल्या कारकिर्दीचा आढावा घेताना लता मंगेशकर यांनी दिलेली दाद आपल्यासाठी अविस्मरणीय असल्याचे सांगितले. अशोक पत्की म्हणाले, चित्रपटांची गीते, शीर्षक गीते आणि जाहिरातींचे जिंगल्स हे सुरावटींमध्ये बसवताना लोकांना जे आवडते ते शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करावा लागतो. पूर्वी शब्दांवर चाल बसविण्याचे काम संगीतकार करीत होते. परंतु, सद्यस्थितीत चाल तयार करून त्यावर शब्द तयार करून घेण्यासाठी अनेजण आग्रही असल्याने आपण स्वत:च शब्दांमध्ये चाली बसविण्यास सुरुवात केल्याने आपल्यातील कवीचा उदय झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ‘यमुना जळी खेळू खेळ कन्हैया’, ‘तू सप्तसूर माझे’, ‘सूर की नदीया’,‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या गीतांचे अशोक पत्की यांनी सादरीकरण केले. त्यास रसिकांची उत्स्फूर्त दाद दिली. प्रास्ताविक नंदन दीक्षित यांनी केले. सूत्रसंचालन विघ्नेश जोशी यांनी केले. आभार पल्लवी कुलकर्णी यांनी आभार मानले.
साठवणीतील आठवणींना उजाळा
त्रिवेणी महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी उत्तरार्धात आठवण एक साठवण कार्यक्रमातून ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांनी पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. तर ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी ग. दि. माडगूळकर यांच्या सहवासाचे विविध प्रसंग उलगडून सांगितले. ज्येष्ठ संगीतकार गायक श्रीधर फडके बाबूजी तथा सुधीर फडके यांचा सुरेल प्रवासातील विविध प्रसंगासह गदीमा व पु.ल. यांच्यातील विविध किस्से सांगतानाच या त्रयींच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांना सुधीर गाडगीळ यांनी बोलते केले.
..या मान्यवरांचाही झाला सन्मान
त्रिवेणी महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी समाजातील वंचितांच्या विविध घटकांसाठी काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यात डॉ. भरत केळकर, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, विलास शिंदे, सचिन जोशी यांना दीपक चंदे यांच्या हस्ते शाल, स्मृतिचिन्ह, तुळस व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.