चांदगिरीला मोरीचा पुल उभारावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:13 AM2021-03-06T04:13:45+5:302021-03-06T04:13:45+5:30
एकलहरे : नाशिक तालुक्यातील चांदगिरी गावाजवळून जाणाऱ्या महामार्गावर पावसाळ्यात पाणी वाहून जाण्यासाठी साधा पाईप टाकलेला आहे. त्याऐवजी याठिकाणी लहान ...
एकलहरे : नाशिक तालुक्यातील चांदगिरी गावाजवळून जाणाऱ्या महामार्गावर पावसाळ्यात पाणी वाहून जाण्यासाठी साधा पाईप टाकलेला आहे. त्याऐवजी याठिकाणी लहान मोरी करून पुलाची उभारणी करावी, अशी मागणी ग्रामपंचायतीने केली आहे.
याबाबत माजी सरपंच रमेश कटाळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले आहे. मौजे चांदगिरी गावातून राष्ट्रीय महामार्ग ३७ गेलेला आहे. रस्त्याच्या पूर्वेला गावातील पाझर तलाव आहे. या पाझर तलावाचा सांडवा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतो. याठिकाणी पाणी जाण्यासाठी पूल बांधलेला आहे. हा पूल एक पाईपलाईन व छोटा बॉक्स करुन तयार केलेला आहे. मात्र, यातून सांडव्याचे पाणी वाहून जात नाही. पाण्याचा मोठा लोंढा आल्यास सर्व पाणी रस्त्यावर येऊन गावात शिरते. लगतच असलेल्या शेतकऱ्यांच्या कांदा चाळीत पाणी शिरुन साठवलेला कांदा भिजून खराब होतो. काही रहिवाशांच्या घरात पाणी शिरुन घरातील अन्नधान्य भिजून खराब होते. याठिकाणी पाणी वाहून जाण्यासाठी लहान पाईप न टाकता मोरीवर पूल उभारावा, जेणेकरुन पाणी व्यवस्थित वाहून जाईल व गावात शिरणार नाही, असे निवेदनात म्हटले आहे.
(फोटो ०५ पूल) चांदगिरी गावातून जाणाऱ्या महामार्गावर पुलाखालून पाणी वाहून जाण्यासाठी पाईप टाकला आहे.