सात गावांमधील संचारबंदी शिथिल

By admin | Published: October 16, 2016 02:55 AM2016-10-16T02:55:55+5:302016-10-16T02:56:27+5:30

बंदोबस्त मात्र कायम

Curbing of seven villages is looser | सात गावांमधील संचारबंदी शिथिल

सात गावांमधील संचारबंदी शिथिल

Next

 नाशिक : तळेगाव येथील घटनेनंतर तणाव निर्माण झालेल्या जिल्ह्यातील सात गावांमधील संचारबंदी शिथिल करण्यात आली असून, या काळात कोणतीही अनुचित घटना न घडल्याने रात्री लावलेली संचारबंदी टप्प्याटप्प्याने मागे घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तथापि, संवेदनशील भागांमध्ये पोलीस व राज्य राखीव दलाचा बंदोबस्त कायम ठेवण्यात येणार आहे.
रविवारच्या जाळपोळ, दगडफेक व लुटालुटीच्या घटनेनंतर इगतपुरी, नाशिक व त्र्यंबकेश्वर या तालुक्यातील आठ गावांमध्ये सोमवार पहाटेपासून संचारबंदी जारी करण्यात आली होती. समाजकंटकांनी मुंबई-आग्रा महामार्गावर तुफान दगडफेक करून वाहने पेटवून देण्याचे प्रकार
केले, त्याचबरोबर प्रतिस्पर्धी गटावर चाल करून जाण्याचे प्रकारही घडले होते. त्यामुळे पोलिसांना लाठीमार, अश्रुधूराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या तर पाडळी येथे जमाव काबूत आणण्यासाठी गोळीबाराच्या फैरीही झाडाव्या लागल्या. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊनच विल्होळी, वाडीवऱ्हे, गोंदे, सांजेगाव, शेवगेडांग, महिरावणी, अंजनेरी, तळेगाव, तळवाडे या गावांमध्ये सलग ७२ तास संचारबंदी जारी करण्यात आली होती. या काळात कोणतीही अनुचित घटना घडली नसली तरी, खबरदारी म्हणून शुक्रवारी मुदत संपल्यानंतरही पोलीस व प्रशासनाने संचारबंदीत पुन्हा चोवीस तासांनी वाढ केली होती. त्याची मुदत शनिवारी दुपारी बारा वाजता संपल्याने नागरिकांचे दैनंदिन व्यवहार पूर्ववत सुरू झाले, परंतु वातावरणात तणाव कायम असल्याने परिस्थितीवर पूर्णत: नियंत्रण मिळविता आले नाही. समाजकंटकांकडून शनिवारी रात्री पुन्हा संचारबंदी शिथिलतेचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता वर्तवून पोलीस खात्याने शनिवारी सायंकाळी सहा ते रविवारी सकाळी सहा वाजेपर्यंत अशा बारा तासांसाठी पुन्हा वाडीवऱ्हे, गोंदे, सांजेगाव, महिरावणी, अंजनेरी, तळेगाव व तळवाडे या सहा गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. रविवारी परिस्थिती पाहून संचारबंदी वाढविण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

त्र्यंबकेश्वर, इगतपुरी व नाशिक तालुक्यातील गावांमधील जनजीवन आता पूर्वपदावर येत असून पोलिसांकडून दंगलखोरांची ओळख पटवून त्यांना अटक करण्याचे काम सुरूच आहे. ग्रामीण पोलिसांनी शनिवारी (दि़ १४) वाडीवऱ्हे, घोटी, गोंदे, तळेगाव-अंजनेरी, शेवगेदारणा या परिसरातून ८२ संशयित दंगलखोरांना अटक केली होती, त्यामध्ये आज आणखी संशयितांची भर पडली असून, १४७ दंगलखोरांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांकडून दंगलखोरांचा शोध सुरू आहे़

Web Title: Curbing of seven villages is looser

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.