शहर परिसरातही संचारबंदी नावापुरतीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:14 AM2021-04-16T04:14:23+5:302021-04-16T04:14:23+5:30
नाशिकरोड, जेलरोडच्या भाजीपाला बाजारात कुठल्याही प्रकारे नियम न पाळता, गर्दी करण्यात आली. हॉटेल, चहाचे हातगाडी, दुकाने, टपऱ्या या ठिकाणीही ...
नाशिकरोड, जेलरोडच्या भाजीपाला बाजारात कुठल्याही प्रकारे नियम न पाळता, गर्दी करण्यात आली. हॉटेल, चहाचे हातगाडी, दुकाने, टपऱ्या या ठिकाणीही गर्दी होत आहे. परिसरात अनेक पानटपऱ्या राजरोसपणे छुप्या पद्धतीने सुरु आहेत. दुप्पट भावाने पान, सिगारेट व बंदी असलेल्या गुटख्याची सर्रासपणे विक्री केली गेली. उड्डाणपुलाखालील भाजीबाजार, वास्को चौक, गायकवाड मळा परिसर, मुक्तिधाम चौक, जेलरोड, सुभाषरोड, जयभवानीरोड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
-----
सिडकोत सर्व व्यवहार सुरुळीत
सिडको व अंबड या दाट लोकसंख्या असलेल्या भागात अत्यावश्यक सेवेच्या व्यतिरिक्त इतर दुकाने बंद ठेवण्यात आली असली तरी रस्त्यावर मात्र वाहनधारक तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी कायम होती. सिडकोतील त्रिमूर्ती चौक, सिडको हॉस्पिटल समोर मुख्य चौक, माउली चौक तसेच पवननगर व त्रिमूर्ती चौक, भाजी मार्केट आदी ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली असली, तरी नागरिकांची गर्दी पाहता संचारबंदीचा पूर्णतः फज्जा उडाला आहे.
------
पंचवटीत नागरिकांची विचारपूस
संचारबंदीचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी पंचवटी परिसरातील मुख्य वाहतूक मार्ग ओळखल्या जाणाऱ्या पेठरोड, मालेगाव स्टँड तसेच काट्या मारुती चौकात बॅरिकेडिंग टाकून पोलिसांसाठी राहुट्या उभारल्या असून, वाहनांची तपासणी करण्याबरोबरच घराबाहेर पडलेल्या नागरिकांची विचारपूस करूनच त्यांना पुढे सोडण्यात येत आहे. मात्र तरीदेखील अनेक नागरिक विशेषतः तरुण मंडळी दुचाकीवरून परिसरात बिनधास्तपणे फेरफटका मारत उघडपणे संचारबंदीचे उल्लंघन करत असल्याचे चित्र दिसून आले.