जिल्ह्यात महापालिका हद्दीत संचारबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:12 AM2020-12-23T04:12:18+5:302020-12-23T04:12:18+5:30
नाशिक: महापालिका क्षेत्रात मंगळवार (दि.२२) रात्रीपासून संचारबंदी आदेश लागू करण्याची घेाषणा राज्य शासनाने केली असून, संचारबंदीचे हे आदेश नाशिक ...
नाशिक: महापालिका क्षेत्रात मंगळवार (दि.२२) रात्रीपासून संचारबंदी आदेश लागू करण्याची घेाषणा राज्य शासनाने केली असून, संचारबंदीचे हे आदेश नाशिक जिल्ह्यातील महापालिका क्षेत्राला जसेच्या तसे लागू असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. नाशिक आणि मालेगाव महापालिका हद्दीत रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत संचारबंदी आदेश लागू करण्यात आलेले आहेत.
युरोपात आढळलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे राज्यात खबरदारीचा उपाय म्हणून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. तूर्तास महानगरपालिका हद्दीसाठी ही संचारबंदी लागू असणार आहे. त्यानुसार नाशिकसह मालेगाव महापालिका हद्दीत संचारबंदी लागू करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. नाशिक व मालेगाव महापालिका हद्दीत रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत संचारबंदी राहील, असे आदेश लागू केले आहे. मंगळवारी (दि.२२) हे आदेश जारी करण्यात आले असून, ५ जानेवारीपर्यंत ही संचारबंदी कायम राहणार आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी पेालीस आयुक्त तसेच अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी बैठक बोलविली हेाती. या आदेशाचे पालन करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी मांढरे यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.
--इन्फो--
विमानतळ, रेल्वेस्थानकावर सतर्कता
ओझर येथील विमानतळ तसेच रेल्वेस्थानकातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी अधिक काटेकाेर केली जाणार आहे. आवश्यकता असल्यास संशयित प्रवाशाला क्वारन्टिन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. यापूर्वीदेखील प्रवाशांची तपासणी केली जात होतीच. आता त्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
--इन्फो--
पुन्हा चौकांमध्ये दिसणार पोलीस
रात्री ११ वाजेपासूनच संचारबंदी लागू असल्यामुळे रात्री प्रमुख चाैकांमध्ये बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे तर पोलीस गस्तदेखील वाढविली जाणार आहे. रात्री अकरा वाजतानंतर नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अशा सूचना प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आहेत.
---इन्फो--
सेलीब्रेशवर विरजन
नाताळाचा सण तसेच नववर्ष स्वागतासाठी सेलिब्रेशनचे मनसुबे आखणाऱ्यांवर नाईट कर्फ्यूचे विरजन पडले आहे. संचारबंदी लागू असल्यामुळे कुठेही गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना पोलिसांकडून करण्यात आलेल्या आहेतच, आता बंदोबस्तही वाढणार असल्याने यंदा सेलिब्रेशनवर परिणाम होणार आहे.
--कोट--
आदेशाचे पालन करावे
राज्य शाससाने जाहीर केलेेले संचारबंदीचे आदेश जिल्ह्यात जसेच्या तसे लागू करण्यात येत आहेत. केवळ महापालिका क्षेत्रातच संचारबंदीचे आदेश लागू राहणार आहेत. सलग सुट्या असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये, स्वत:ची आणि इतरांचीही काळजी घेणे अपेक्षित आहे. संचारबंदी आदेशाचे पालन करावे.
- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी.