सिडको सभापतिपदासाठी सेनेच्या उमेदवाराविषयी उत्सुकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:11 AM2021-07-11T04:11:53+5:302021-07-11T04:11:53+5:30
सिडको : महापालिकेच्या सिडको प्रभागावर गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे वर्चस्व कायम आहे. त्यामुळे सलग पाचव्या वर्षीही सिडको प्रभागावर ...
सिडको : महापालिकेच्या सिडको प्रभागावर गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे वर्चस्व कायम आहे. त्यामुळे सलग पाचव्या वर्षीही सिडको प्रभागावर शिवसेनेचाच सभापती होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. परंतु, या पदासाठी शिवसेनेत देखील मोठ्या प्रमाणात रस्सीखेच असल्याने सभापती पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
सिडको प्रभाग सभापतिपदासाठी गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही इच्छुकांची संख्या अधिक असल्याने सभापतीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. गेल्या तीन-चार वर्षांत महापालिकेतील विविध पदांचा लाभ घेणाऱ्या नगरसेवकांना संधी न देता ज्या नगरसेवकांना पदे मिळाली नाहीत अशांना सिडको प्रभाग सभापती पदावर सभापतिपद देणार असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी शिवसेनेकडून सुवर्णा मटाले, कल्पना चुंबळे, प्रवीण तिदमे, शामकुमार साबळे, संगीता जाधव, किरण गामणे यांनी तयारी दर्शविली आहे. परंतु, नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सदस्य पदाच्या निवडीत नगरसेवक सुवर्णा मटाले यांनी सिडको प्रभाग सभापतिपद मिळावे यासाठी स्थायी समिती सदस्यपद न घेता पक्षाच्या नेत्यांना सभापतिपद मिळावे असे कळविले आहे. त्यामुळे शिवसेनेत इच्छुकांची संख्या अधिक असली तरी सुवर्णा मटाले यांनाच सभापती होण्याचा मान मिळणार असल्याचे शिवसेनेच्या गोटातून बोलले जात आहे.
चौकट===
सिडको प्रभागात २४ नगरसेवकांपैकी शिवसेनेचे १४ नगरसेवक होते. परंतु, शिवसेनेच्या ज्येष्ठ महिला नगरसेवक कल्पना पांडे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्याने शिवसेनेचे सध्या १३ नगरसेवक आहेत. या पाठोपाठ भाजपचे ९, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र महाले हे एकमेव नगरसेवक आहेत.
कोट====
सिडको प्रभागावर शिवसेनेचाच सभापती होणार हे निश्चित आहे. परंतु, शिवसेनेतही सभापतिपदासाठी इच्छुकांची संख्या अधिक असल्याने याबाबत पक्षप्रमुख यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते संजय राऊत व संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी हे जो उमेदवार देतील, तोच शिवसेनेचा सभापती असेल.
सुधाकर बडगुजर
शिवसेना महानगरप्रमुख