मुख्यमंत्र्यांच्या घोषणेची उत्सुकता
By admin | Published: May 28, 2017 01:15 AM2017-05-28T01:15:34+5:302017-05-28T01:19:00+5:30
नाशिक : शहराला दत्तक घेण्याची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी बैठक होणार आहे.
नाशिक : शहराला दत्तक घेण्याची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी (दि.२८) महापालिकेच्या राजीव गांधी भवनमध्ये महत्त्वपूर्ण बैठक होणार असून, प्रशासनामार्फत यावेळी मुख्यमंत्र्यांकडे विविध प्रकल्पांसाठी २१७३ कोटी रुपयांची मागणी केली जाणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री महापालिकेच्या पदरात किती दान टाकतात, याबाबत लोकप्रतिनिधींसह प्रशासनाची उत्सुकता ताणली गेली आहे. फेब्रुवारीत झालेल्या महापालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा केली होती. त्यानंतर, सर्वाधिक ६६ जागांवर विजय संपादन करत भाजपाने महापालिकेतील सत्ता हस्तगत केली. भाजपाने एकहाती सत्ता प्राप्त केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस पहिल्यांदाच महापालिकेच्या राजीव गांधी भवनमध्ये पाऊल टाकणार आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी प्रशासकीय यंत्रणा दोन दिवसांपासून कामाला लागली आहे. महापालिका मुख्यालयातील स्थायी समितीच्या सभागृहात दुपारी १२.३० वाजता बैठक होणार असून, यावेळी आयुक्त अभिषेक कृष्ण हे महापालिकेच्या विविध प्रस्तावित प्रकल्पांचे सादरीकरण करणार आहेत. यावेळी महापालिकेकडून मुख्यमंत्र्यांकडे २१७३ कोटी रुपयांची मागणी केली जाणार आहे.