दहावीच्या निकालाची उत्सुकता; शनिवारी शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 01:41 AM2018-06-06T01:41:57+5:302018-06-06T01:41:57+5:30
नाशिक : बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना दहावीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. सोशल मीडियावर पंधरा दिवसांपूर्वीच ६ जून रोजी निकाल जाहीर होणार असल्याची पोस्ट फिरत असल्याने पालकांना सहा तारखेची प्रतीक्षा होती. परंतु याबाबतची कोणतीही माहिती राज्य मंडळाकडून प्राप्त झाली नसल्याने निकाल नेमका कधी लागणार याबाबतची अनिश्चितता कायम आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार अद्याप दोन विभागीय मंडळांच्या निकालाचे काम पूर्ण होऊ शकले नसल्याने निकाल जाहीर करण्यास विलंब होत आहे.

इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, सीईटी आणि नीट परीक्षांचेदेखील निकाल हाती आले आहेत. निकालाच्या या हंगामात दहावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रचंड उत्सुकता लागून आहे. ६ जून रोजी निकाल जाहीर होणार असल्याची बातमी सोशल मीडियावर यापूर्वीच फिरत असल्याने मुलांना सहा तारखेची प्रतीक्षा होती. विशेष म्हणजे बारावी परीक्षेचा निकाल ३० मे रोजी जाहीर होण्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आणि त्यानुसार निकालही जाहीर झाला. त्याचवेळी दहावीचा निकाल ६ जून रोजी जाहीर होणार असल्याचीदेखील पोस्ट फिरत होती. त्यामुळे दहावीचा निकालदेखील सहा तारखेलाच जाहीर होण्याची दाट शक्यता गृहीत धरून पालक आणि विद्यार्थी निकालाची वाट पाहत होते.
प्रतीक्षा कायम
दहावीचा निकाल नेमका कधी आहे याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी विद्यार्थी आणि त्यांचे पालक विभागीय मंडळ तसेच प्रसारमाध्यमांच्या कार्यालयात भ्रमणध्वनी करून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होते. निकालाच्या तारखेबाबत राज्य मंडळाकडून सायंकाळपर्यंत कोणतीही माहिती जाहीर करण्यात आली नसल्याने निकालाच्या प्रतीक्षेत मुलांना दिवस घालवावा लागला. दरम्यान, दि. ८ किंवा ९ रोजी निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.