जिज्ञासू नाशिककरांनी वृक्ष अभ्यासाचे गिरविले धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:10 AM2020-12-07T04:10:04+5:302020-12-07T04:10:04+5:30
झाडे लावा, झाडे जगवा’ हे घोषवाक्य सर्वश्रुत आहे; मात्र ‘योग्य ठिकाणी योग्य देशी प्रजातीच्या झाडांची निवड हीच खरी काळाची ...
झाडे लावा, झाडे जगवा’ हे घोषवाक्य सर्वश्रुत आहे; मात्र ‘योग्य ठिकाणी योग्य देशी प्रजातीच्या झाडांची निवड हीच खरी काळाची गरज’ असा संदेश देणाऱ्या नाशिक देवराई व वनराई फुलविण्यासाठी कृतिशील प्रयत्न करणाऱ्या आपलं पर्यावरण संस्थेसोबत नाशिक पश्चिम वनविभागाने ‘निसर्ग शाळा’ हा आगळावेगळा जनप्रबोधनाचा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमाची सुरुवात रविवारी उपनगर येथील वृक्ष परिचय उद्यानातून करण्यात आली. यावेळी कडाक्याच्या थंडीतसुद्धा सकाळी ७ वाजता काही मोजके जिज्ञासू व्यक्तींनी शाळेच्या पहिल्या वर्गाला हजेरी लावली. यावेळी उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांनी आलेल्या नागरिकांना ‘निसर्ग शाळा’ ही संकल्पना समजावून दिली. या शाळेचा दर पंधरवड्याला एक वर्ग शहरातील देशी प्रजातींच्या वृक्षराजीच्या सानिध्यात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष वृक्षप्रेमी शेखर गायकवाड यांनी आलेल्या नागरिकांना उद्यानातील सुमारे ४५ देशी प्रजातीच्या झाडांची ओळख करून दिली. यावेळी वृक्षाचा अभ्यास करताना तेथील मातीपासून खोड, पाने, फुले, फळे यांचे निरीक्षण महत्त्वाचे ठरते असे ते म्हणाले.
--कोट---
प्रत्येक वृक्षाविषयीची माहिती जाणून घेत असताना यावेळी उपस्थितांमधील जिज्ञासा पहावयास मिळाली. नाशिककरांमधील वृक्षप्रेम अधिकाधिक वृद्धिंगत व्हावे, जेणेकरून नाशिकच्या पर्यावरणाचे संतुलन टिकून राहण्यास आणि जैवविविधता समृद्ध होण्यास मदत होईल, हा निसर्गशाळेमागील खरा उद्देश आहे.
- पंकज गर्ग, उपवनसंरक्षक
-------