द्राक्षपंढरीत बेदाणा व्यावसायिकांची लगीनघाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 09:07 PM2021-02-22T21:07:31+5:302021-02-23T23:35:24+5:30
लखमापूर : दिंडोरी तालुक्याच्या द्राक्ष पंढरीत सध्या व्यापारी मोठ्या प्रमाणावर आल्याने बळिराजा आपल्या द्राक्षे बागा खाली करण्यावर भर देत आहे. त्यातच बेदाणा व्यावसायिकांचीही बेदाणा निर्मितीसाठी लगीनघाई सुरू झाली आहे. त्यासाठी शेड उभारणीची लगबग मोठ्या प्रमाणावर दिसत आहे.
द्राक्ष पंढरीत द्राक्षे खरेदी करण्यासाठी व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणात आगमन झाल्याने कामगारांच्या रोजगारांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. कोरोना, अवकाळी पाऊस, गारपीट, बदलत्या हवामानाचा सामना करीत जवळपास एक दीड महिना उशिराने दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष पंढरीत द्राक्षे काढणीला सुरुवात झाली. आता द्राक्षे खरेदीसाठी विविध राज्यांतून व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने शेतकरी वर्गाच्या द्राक्ष भावाबाबतीत आशा उंचावल्या आहेत. तसेच द्राक्षे काढणीसाठी मजूर वर्ग मोठ्या प्रमाणावर लागत असल्यामुळे मजूर वर्गालाही आता हक्काचे काम मिळून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत आहे. तसेच द्राक्षे मण्यांपासून बेदाणा निर्मितीला प्रारंभ होत असून, बेदाणा व्यावसायिकांची मोठी लगबग पाहायला मिळत आहे.
बेदाणा निर्मितीची लगबग
दिंडोरी तालुक्यातील लखमापूर, दहेगाव, करंजवण, वरखेडा, दिंडोरी, परमोरी, पालखेड, कोराटे, सोनजांब, दिंडोरीचा पश्चिम पट्टा, तसेच कादवा काठच्या परिसरात द्राक्षांचे मोठ्या प्रमाणावर क्षेत्र आहे. या गावांना द्राक्षमाल बाजारपेठेत पाठविण्यासाठी आवश्यक वाहतुकीच्या सोयी सुविधांसह व्यापाऱ्यांची उपलब्धी खेडगाव, पिंपळगाव, वणी, वडनेरभैरव येथे आहे. त्यामुळे वाहतुकीची साधने, कामगारांची रेलचेल यामुळे द्राक्ष पंढरी गजबजली आहे. सध्या द्राक्षे खरेदी साठी कोलकता, गोरखपूर, बनारस, पटणा, इलाहाबाद, गुजरात, इ. विविध राज्यांतून मोठ्या प्रमाणावर व्यापारी वर्ग दाखल झाला आहे. बेदाणा व्यवसाय सुरू करण्यासाठी व्यावसायिक शेड उभारणीसाठी बांबू, बारदाण, सुताळी, गंधक, व बेदाणा प्रक्रियासाठी आवश्यक असणारे साधने खरेदी करण्यासाठी रेलचेल सुरू आहे. मागील हंगामात कोरोना मुळे ६० टक्के शेतकरी वर्गाने बेदाणा घरी तयार केला होता. त्यामुळे नगदी भांडवल उपलब्ध झाले होते. त्यामुळे बरेच शेतकरी सध्या द्राक्षे मणी खरेदी करून बेदाणा व्यवसायात उतरले आहेत.
मागील हंगामात कोरोनामुळे आम्ही बेदाणा व्यवसाय करण्यास सुरुवात केली. परंतु, त्यावेळी असंख्य शेतकरी वर्गाने बेदाणा व्यवसायांत प्रवेश केल्यामुळे बेदाण्याचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर तयार झाले. आता भाव मिळेल की नाही ही भीती होती. परंतु, कोरोनाचे वातावरण बदलत गेल्यामुळे बेदाण्याला चांगली मागणी वाढत गेल्याने सध्या शेतकरी वर्गाकडे बेदाणा शिल्लक नाही. त्यामुळे यंदा पण असंख्य शेतकरी बेदाणा व्यवसाय करण्यावर भर देत आहे.
- वाल्मीक मोगल, बेदाणा व्यावसायिक, लखमापूर