खड्ड्यांचा शाप; डोक्याला ताप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 10:52 PM2019-12-27T22:52:53+5:302019-12-27T22:53:22+5:30
मालेगाव शहर व परिसरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे खड्ड्यातून मालेगावकरांना वाट काढावी लागत आहे. ठिकठिकाणी साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे रस्ते पूर्ण उखडले आहेत. पावसाळा उघडून दोन महिने उलटले आहेत, मात्र तरी देखील महापालिकेकडून रस्ता दुरुस्ती केली जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
मालेगाव : शहर व परिसरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे खड्ड्यातून मालेगावकरांना वाट काढावी लागत आहे. ठिकठिकाणी साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे रस्ते पूर्ण उखडले आहेत. पावसाळा उघडून दोन महिने उलटले आहेत, मात्र तरी देखील महापालिकेकडून रस्ता दुरुस्ती केली जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील डी. के. कॉर्नर ते चर्चगेट तसेच दाभाडी रस्ता या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. या रस्त्यावरून सोमवार बाजार, मालेगाव कॅम्प, नामपूर व कृषी कार्यालय आहे. त्यामुळे सतत वर्दळ असते. या रस्त्यामुळे दुचाकीचालक, वयोवृद्ध महिला व विद्यार्थ्यांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागते. वाहने खड्ड्यात आदळतात त्यामुळे अपघातास आमंत्रण मिळून पाठदुखीचा त्रास वाहनचालकांना होत आहे. खड्डे टाळण्याच्या प्रयत्नात या भागात किरकोळ अपघातही घडले आहेत. सोयगावसह अनेक भागात पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यांची वाट लागली आहे. पाण्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रात्रीच्या वेळेस खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे अनेक वाहनचालकांचे अपघात होत आहेत. यामुळे मनपा प्रशासनाने त्वरित खड्ड्यांची डागडुजी व कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
महापालिकेकडून तात्पुरती मलमपट्टी
गेल्या तीन ते चार महिन्यांपासून शहरातील नागरिक रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे त्रस्त आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून रस्त्यांची तात्पुरती मलमपट्टी केली जात आहे. प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांची डागडुजी केली जात आहे. तर काही खड्ड्यांमध्ये केवळ दगड व कमी थराचे डांबर मारुन खड्डे बुजविली जात आहेत. मनपाने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
शहरातील बहुतांश भागातील रस्ते पावसाच्या पाण्यामुळे उखडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक वेळा लहान-मोठे अपघातही घडत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन खड्डे कायमस्वरूपी बुजवून रस्त्यांची दुरुस्ती करावी.
- स्वप्नील हिरे, नागरिक, सोयगाव