ग्राहकांच्या गर्दीने बाजारपेठेला झळाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 12:09 AM2018-11-05T00:09:28+5:302018-11-05T00:09:42+5:30
वसूबारसच्या मुहूर्तापासून खऱ्या अर्थाने दिवाळीला सुरुवात झाली असून, या दीपोत्सवाच्या खरेदीचा उत्साह रविवारी (दि. ४) शिगेला पोहोचल्याचे पहायला मिळाले. शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली.
नाशिक : वसूबारसच्या मुहूर्तापासून खऱ्या अर्थाने दिवाळीला सुरुवात झाली असून, या दीपोत्सवाच्या खरेदीचा उत्साह रविवारी (दि. ४) शिगेला पोहोचल्याचे पहायला मिळाले. शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. दिवाळीतील पहिल्याच दिवशी रविवारची साप्ताहिक सुटी असल्याने आणि शाळा, महाविद्यालयांनाही दिवाळीची सुटी सुरू झाल्याने आत्तापर्यंत दिवाळीची खरेदी करू न शकणाºया ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याने बाजारपेठ फुलून गेली होती. परंतु दुपारनंतर शहरात अचानक आलेल्या पावसाने खरेदीच्या आनंदावर विरजण घातले. अचानक ढगांच्या गडगटासह पावसाच्या सरी कोसळल्याने किरकोळ विक्रेत्यांचीही तारांबळ उडाली. दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गृहसजावटीचे आणि देवदेवतांच्या पूजनाच्या वस्तूंसह नवीन कपडे, दागिने खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मेनरोड परिसरातील बाजारपेठेत गर्दी केल्याने दुचाकी वाहन चालविणे कठीण झाले होते. नाशिककरांनी सणाच्या पहिल्याच दिवशी मिळालेल्या रविवारच्या साप्ताहिक सुटीची संधी साधून मेनरोड, एमजीरोड, रविवार कारंजा, कॉलेजरोड परिसरात खरेदीसाठी गर्दी केली. तसेच शहरातील विविध शोरूम्स आणि मॉलमध्येही ग्राहकांची वर्दळ वाढलेली दिसून आली. व्यावसायिकांनी दिवाळी सणासाठी खरेदी करणाºया ग्राहकांसाठी वेगवेगळ्या आकर्षक योजना जाहीर केल्या असून, विविध बँकांना आॅनलाइन आणि कॅशलेस व्यवहार करणाºया ग्राहकांना खास सवलती दिल्या आहेत. परंतु अनेक ग्राहकांना अशाप्रकारे आॅनलाइन अथवा कॅशलेस व्यवहार करणे जमत नाही. अशातच पुढील सप्ताहात ऐन सणासुदीच्या काळात लक्ष्मीपूजन आणि दिवाळी पाडवा व दुसरा शनिवार व रविवारच्या साप्ताहिक सुटीमुळे बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना बँकांमधून पैसेही मिळणार नसल्याने अनेकांनी दिवाळीपूर्वीच बँकांमधून पैसे काढून रविवारी बाजारात खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून आले. परंतु, दुपारनंतर शहरात अचानक ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळल्याने नागरिकांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले.
पणत्या, आकाशकंदीलची खरेदी
प्रकाशाचा उत्सव म्हणून दिवाळी सण भारतीय संस्कृतीत देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विविधरंगी पणत्या, आकाशकंदील, नवीन कपडे अशा सर्व वस्तूंनी हा सण साजरा केला जातो. त्यामुळे अशा वस्तूंसोबतच रेडिमेड फराळाचीही रविवारी मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. कापड बाजारापासून इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे विक्रेते वेगवेगळ्या आॅफर्स देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत असून ग्राहकांकडून मुख्यत: रेडिमेड कपड्यांना मोठी पसंती दिली जात आहे.
दिवाळीत रेडिमेड फराळी पदार्थांची चलती
गेल्या काही वर्षांपासून रेडिमेड फराळी पदार्थांची चलती आहे. चिवडा, शेव, चकली, लाडू, शंकरपाळे असे फराळाचे पदार्थ घरी बनवण्यापेक्षा रेडिमेड आणण्याकडे अनेक महिलांचा कल असतो. हा कल जाणत घरगुती फराळांची मोठी उपलब्धता बाजारात निर्माण करून दिली जात आहे, तर अनेक महिलांना दिवाळ सणासाठी स्वत:च्याच हाताने तयार केलेले पदार्थ हवे असतात. त्यामुळे किराणा मालाच्या दुकांनामध्येही ग्राहकांची गर्दी वाढली आहे.
विक्रेत्यांची तारांबळ
नाशिकच्या बाजारपेठेत रविवारी दीपोत्सवाच्या खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे रस्त्यावरील फेरीवाल्यांसह बाजारपेठेतील विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. अचानक वादळी वाºयासह पावसाचे आगमन झाल्याने मेनरोड परिसरासह शहरातील विविध भागात सुमारे दीड ते दोन तास वीजपुरवठा खंडित झाल्याने प्रमुख बाजारपेठांमध्येही अंधार पसरल्याने मोठ्या प्रमाणात व्यवहार ठप्प झाल्याने दिवाळीची खरेदी करण्यासाठी उत्साहाने बाजारपेठेत आलेल्या ग्राहकांच्या आनंदावरही पावसाने विरजण घातले.