सफाई कर्मचाऱ्याचा मृतदेह ताब्यात
By admin | Published: September 7, 2015 12:28 AM2015-09-07T00:28:30+5:302015-09-07T00:28:59+5:30
आयुक्तांविरोधात संताप : प्रशासनाने वाऱ्यावर सोडल्याचा आरोप
नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील कारखान्यामध्ये तुंबलेले गटारीचे चेंबर स्वच्छ करण्यासाठी उतरलेल्या पालिकेच्या दोन सफाई कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.५) घडली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या मेघवाळ समाजाने मयत विनोद मारू यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आज रविवारी दुपारी एक वाजता मारू यांच्या नातेवाइकांनी विनोद यांचा मृतदेह ताब्यात घेतला.
सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेविषयी महापालिका प्रशासन उदासीन भूमिकेत आहे. यामुळे सफाई कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागत आहे. केवळ वारसदारांना नोकरीत सामावून घेण्याच्या आश्वासनाने ही समस्या सुटणारी नसून पालिका आयुक्तांनी जिल्हा रुग्णालयात येऊन नातेवाइकांशी प्रशासनप्रमुख या नात्याने संवाद साधणे अपेक्षित होते; मात्र त्यांची उदासीन भूमिका ही माणुसकीला काळिमा फासणारी असल्याचा आरोप मेघवाळ समाजाचे अध्यक्ष सुरेश मारू यांनी केला आहे. यावेळी पालिका आयुक्तांविरोधात प्रशासनप्रमुख म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा मारू यांनी दिला. दरम्यान, उपस्थित संतप्त नातेवाइकांनी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याविरुद्ध असलेल्या संतापाला घोषणाबाजीच्या माध्यमातून वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न केला.
दुपारी एक वाजेच्या सुमारास माधव मारू, सुरेश मारू यांची भ्रमणध्वनीवरून महापौर अशोक मुर्तडक यांनी समजूत काढली. त्यानंतर नातेवाइकांनी विनोद यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी ताब्यात घेतला. सोमेश्वर, सातपूर या दोन्ही घटनांची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये, सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी मेघवाळ समाज महापालिकेच्या दारापुढे आंदोलन करणार असल्याचे मारू यांनी यावेळी सांगितले.
सातपूर औद्योगिक वसाहतीतील सी १२ / १ भूखंडावरील साईश इंजिनिअरिंग कंपनीचे मालक प्रमोद वैद्य यांनी कंपनीत तुंबलेली गटार साफ करण्यासाठी शनिवारी महापालिका कर्मचारी विनोद मारू व दीपक माळी हे कंपनीत गटारीचे चेंबर साफ करण्यासाठी आले होते. (प्रतिनिधी)