हतगड शिवारातील छाप्यात सव्वा लाखाचा मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:30 AM2017-10-11T00:30:55+5:302017-10-11T00:31:10+5:30
वणी-सापुतारा महामार्गावरील हतगड शिवारातील दोन हॉटेल्सवर छापा टाकून ग्रामीण पोलिसांच्या अवैध धंदेविरोधी पथकाने विनापरवाना विक्रीसाठी ठेवलेला सव्वा लाख रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे़
नाशिक : वणी-सापुतारा महामार्गावरील हतगड शिवारातील दोन हॉटेल्सवर छापा टाकून ग्रामीण पोलिसांच्या अवैध धंदेविरोधी पथकाने विनापरवाना विक्रीसाठी ठेवलेला सव्वा लाख रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे़ या प्रकरणी चौघा संशयितांना अटक करण्यात आली असून, एक वाहनही जप्त करण्यात आले आहे़
ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांना हतगड शिवारातील अद्विती व एकविरा या हॉटेलमध्ये विनापरवाना मद्यविक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार पोलीस पथकाने अद्विती हॉटेलवर सोमवारी (दि़९) छापा टाकला असता परप्रांतिय राकेश चौधरी (३३, मूळ रा. बिहार हल्ली अद्विती हॉटेल, हतगड) हा मद्यविक्री करीत होता़ या हॉटेल्समधून १ लाख ७१ हजार १३९ रुपये किमतीचे देशी-विदेशी मद्य जप्त करण्यात आले़ या हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या बोलेरो वाहनातील संशयित संजय भागाजी वाघ (३६), कुशाल राजेंद्र सोनजे (२७, रा. दोघे अभोणा, ता. कळवण) यांना ताब्यात घेऊन वाहनाची तपासणी केली असता ७३ हजार ६३२ रुपयांचा मद्यसाठा मिळून आला. या कारवाईत पोलिसांनी ७ लाख ९४ हजार ७७१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़ ग्रामीण पोलीस पथकातील काही कर्मचाºयांनी हॉटेल एकविरा येथे छापा टाकून संशयित कृष्णा गावित यास ताब्यात घेऊन हॉटेलची तपासणी केली असता ३४ हजार ०१७ रुपयांचा मद्यसाठा आढळून आला. या प्रकरणी सुरगाणा पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.