शिरुरच्या सराफ व्यावासयिकाच्या खूनातील संशयित ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:13 AM2021-06-02T04:13:22+5:302021-06-02T04:13:22+5:30
शिरूर कासार येथील सराफ व्यावसायिक विशाल कुलथे यांनी संशयित ज्ञानेश्वरची सोन्याचे दागिने बनवण्यासाठी ऑर्डर स्वीकारली होती. २० मे रोजी ...
शिरूर कासार येथील सराफ व्यावसायिक विशाल कुलथे यांनी संशयित ज्ञानेश्वरची सोन्याचे दागिने बनवण्यासाठी ऑर्डर स्वीकारली होती. २० मे रोजी सायंकाळी विशाल हे ज्ञानेश्वरच्या दुचाकीवर बसून दागिने देण्यासाठी गेले. मात्र, त्यानंतर ते पुन्हा घरी परतलेच नाहीत. सखोल चौकशीत विशाल व ज्ञानेश्वर एकाच दुचाकीवरून सोबत गेल्याचे दिसले. त्यानंतर ज्ञानेश्वर हा फरार झाला होता. बीड पोलिसांनी तपास केला असता ज्ञानेश्वर याने इतर संशयितांच्या मदतीने विशाल यांचा खून करून त्यांच्याकडील ११ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व ४ किलो चांदी असे ८ लाख ३७ हजार ८०० रुपयांच्या दागिन्यांची लूट केल्याचे उघडकीस आले. तसेच विशाल यांचा मृतदेह शेवगाव तालुक्यात पुरला. गुन्हा केल्यानंतर ज्ञानेश्वर नाशिकला आश्रयास असल्याची माहिती तेथील पोलिसांकडून शहर पोलिसांना मिळाली. याबाबत गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरविली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांनी पथक तयार केले. मिळालेल्या गुप्त माहितीवरून सहाय्यक निरीक्षक रघुनाथ शेगर, दिनेश खैरनार, रवींद्र बागुल, नाझीम पठाण, दिलीप मोंढे, विशाल काठे यांच्या पथकाने अरिंगळे मळ्यात सापळा रचला. तेथून ज्ञानेश्वर यास शिताफीने अटक करण्यात आली.
---इन्फो---
पत्नीसोबत होता वास्तव्यास
पोलिसांनी ज्ञानेश्वर यास खाकीचा हिसका दाखवून कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. अरिंगळे मळा परिसरात ज्ञानेश्वर हा त्याच्या पत्नीसोबत घटना घडल्यापासून वास्तव्यास आला होता. या गुन्ह्यातील त्याचे साथीदार आणि मुद्देमाल आदींच्या तपासासाठी त्याचा ताबा पुढील तपासाकरिता बीड पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे. विशाल यांचे बंधू कैलास सुभाष कुलथे यांच्या फिर्यादीनुसार बीडमध्ये ज्ञानेश्वरविरूध्द खून, जबरी लुटीचा गुन्हा दाखल आहे.