नाशिकरोडला ग्राहकांची पळापळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 10:00 PM2020-05-04T22:00:16+5:302020-05-04T22:56:49+5:30
नाशिकरोड : सरकारने राज्यातील सर्व देशी-विदेशी मद्यविक्रीची दुकाने सुरू करण्याचा निर्णय निर्णय घेतल्याने सोमवारी (दि.४) दुपारी नाशिकरोड परिसरातील देशी-विदेशी मद्यविक्रीच्या दुकानाबाहेर शेकडो तळीरामांनी गर्दी केली.
नाशिकरोड : सरकारने राज्यातील सर्व देशी-विदेशी मद्यविक्रीची दुकाने सुरू करण्याचा निर्णय निर्णय घेतल्याने सोमवारी (दि.४) दुपारी नाशिकरोड परिसरातील देशी-विदेशी मद्यविक्रीच्या दुकानाबाहेर शेकडो तळीरामांनी गर्दी केली. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार करीत मद्यविक्रीची दुकाने बंद करून सर्वांना या भागातून हटविण्याची कारवाई केली.
सोमवारी सकाळी ९ वाजेपासून नाशिकरोड परिसरातील देशी-विदेशी मद्यविक्रीच्या दुकानाजवळ तळीरामांची गर्दी होण्यास सुरुवात झाली होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश प्राप्त न झाल्याने दुपारपर्यंत दुकाने सुरू झालेली नव्हती. दरम्यानच्या काळात मद्यपींची होत असलेली गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना वारंवार सूचना करून गर्दी हटवावी लागत होती. मात्र दुपारी ३ वाजेच्या सुमारास दुकाने उघडली गेली. दुकाने उघडताच परिसरातील मद्यपींच्या लांबच लांब रांगा लागल्या. कोरोनाच्या संदर्भात असलेले नियम, फिजिकल डिस्टन्स, दुकानात ठेवायचे सॅनिटायझर या सर्व गोष्टींना हरताळ फासला गेला. मद्यपिंची वाढत चाललेली गर्दी त्याठिकाणी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांच्या आवाक्याबाहेर गेल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तत्काळ मद्यविक्रीची दुकाने बंद करण्याच्या सूचना देत दुकानाच्या बाहेर गर्दी हटविण्यास सुरुवात केली. दुकानांबाहेरील गर्दी हटविताना पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला. तरीही अनेकजण लपून दुकाने पुन्हा सुरू होण्याची प्रतीक्षा करीत असल्याने अखेर पोलिसांनी गल्लोगल्ली दुचाकीवर गस्त घालत तळीरामांना हुसकावून लावले, तर दुकानदारांना दुकाने सुरू केल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशाराही दिला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने सुरू होत नसल्याचे तळीरामांच्या लक्षात आल्याने त्यांची घोर निराशा झाली होती. दरम्यान, दारूसाठी गर्दी लक्षात घेऊन सर्वसामान्य नागरिक व महिलांनी लॉकडाउन संपेपर्यंत देशी-विदेशी दारूची विक्री सुरू करू नये, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.