हक्कांप्रती जागृत राहिल्यास ग्राहकांची फसवणूक होणार नाही : मलिंद सोनवणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 06:03 PM2019-12-24T18:03:29+5:302019-12-24T18:04:36+5:30
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या नाशिक जिल्हा शाखेतर्फे अर्थव्यवस्थेतील पंचप्रमाणे असलेल्या घटकांतील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा पंचप्राण पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
नाशिक :ग्राहकाने आपल्या हक्क अधिकारांप्रती जागृत राहून वेगवेगळ्या घटनांमध्ये त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय व फसणुकीच्या प्रकारांविरोधात ग्राहक तक्रार निवारण मंचासमोर आपली बाजू मांडली तर ग्राहकांना निश्चित न्याय मिळून फसवणुकीचे प्रकारही नियंत्रित होऊन ग्राहकांचे हित जपले जाऊ शकेल. त्यासाठी ग्राहक संरक्षणासाठी झटणाऱ्या संस्थांनी ग्राहक संरक्षण कायद्याविषयी जनजागृती करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे यांनी केले. ग्राहक ाच्या हक्कांविषयी अधिकारांची जागृती करताना नवीन ग्राहक संरक्षण कायद्यातील सुधारणांविषयी ग्राहकांना अवगत करण्याची त्यांची फसणूक टाळता येणे शक्य असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
नाशिक जिल्हा पुरवठा विभाग व ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या नाशिक जिल्हा शाखेतर्फे राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेतील आदर्श पंचप्राण पुरस्कारांसह राष्ट्रीय ग्राहक दिन पंधरवड्याच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या शालेय व महाविद्यालयी वक्तृत्व स्पर्धांचे पारितोषिक वितरणही यावेळी करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांच्या अध्यक्षतेत झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात व्यासपीठावर सहायक पुरवठा अधिकारी पंकज पवार, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे विभाग प्रमुख अरुण भार्गवे, जिल्हाध्यक्ष सुधीर काटकर, दत्ता शेळके आदी उपस्थित होते. यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे विभागीय अध्यक्ष अरुण भार्गवे यांनी रेरा कायदा व गृहनिर्माण संस्थाच्या नोंदणीकरणाविषयीच्या समस्या उपस्थित करताना याविषयी ग्राहकांमध्ये जागृती होण्याची गरज व्यक्त केली. जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांनी प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन डॉ. लता पवार यांनी केले. आभार धान्य वितरण अधिकारी श्वेता पाटोळे यांनी मानले. दरम्यान, नाशिकरोड येथील बिंदू रामराम देशमुख महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनी ग्राहक जागृती, चंगळवादी ग्राहकांची निर्मिती आणि महागाई आदी विषयांवर जागृती करणारे पथनाट्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली, तर अन्न व औषध प्रशासन, ग्राहक पंचायत महाराष्ट्र, आरटीओ, कृषी व वजन मापे विभाग यांनी नियोजन भवनच्या आवारात माहितीपर प्रदर्शनातून ग्राहक जागृती केली.
पंचप्राण पुरस्कारार्थी
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या नाशिक जिल्हा शाखेतर्फे अर्थव्यवस्थेतील पंचप्रमाणे असलेल्या घटकांतील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा पंचप्राण पुरस्काराने सन्मान केला. यात मालेगावचे महिंद्र पवार यांना आदर्श शेतकरी, नाशिकचे देवेंद्र कुकडे यांना आदर्श व्यापारी, जयंत राऊत यांना आदर्श कारखानदार, सुनील माळी यांना आदर्श श्रमिक व उदय कुलकर्णी यांना आदर्श ग्राहक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.