मद्यपी गुंडांना रहिवाशांकडून चोप
By admin | Published: September 7, 2015 10:31 PM2015-09-07T22:31:28+5:302015-09-07T22:31:58+5:30
मध्यरात्रीचा प्रकार : अखेर संतापाचा उद्रेक; गस्त थंडावली
नाशिक : भुरट्या चोऱ्या, मुलींची छेडछाड, गल्लीबोळातून रायडिंग, खुलेआम मद्यप्राशन, आरडाओरड, पथदीपांवर दगड भिरकाविण्याबरोबरच अधूनमधून रहिवाशांच्या घरांवरही दगड भिरकाविण्याचे प्रकार मागील पंधरा दिवसांपासून राजवाडा, गोपालवाडी, तलाठी कार्यालयाच्या परिसरात वाढल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संतापाचा उद्रेक शुक्रवारी (दि.४) मध्यरात्रीच्या सुमारास झाला. येथील एका सभागृहाच्या ओट्यावर बसून मद्याच्या बाटल्या रिचवित शिवीगाळ करणाऱ्या तीन गुंडांना रहिवाशांनी एकत्र येऊन चोप दिल्याची घटना घडली.
आॅगस्टच्या दुसऱ्या आठवड्यातच इंदिनरानगर पोलिसांकडून येथील सावित्रीबाई फुले झोपडपट्टी परिसरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कॉम्बिंग आॅपरेशन राबविण्यात आले होते; मात्र या मोहिमेचा गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांमध्ये कुठलाही धाक निर्माण झाल्याचे दिसून येत नाही. मोहिमेनंतर परिसरात सराईत गुन्हेगारांचा उपद्रव अधिकच वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या उपद्रवाला कंटाळून राजवाडा भागातील आबालवृद्धांनी एकत्र येऊन मद्यप्राशन करून मध्यरात्री पावणेदोन वाजेच्या सुमारास परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा गुंडांना चोप देत पोलिसांच्या हवाली केले.
शहरात कुंभपर्वणीचा काळ सुरू असून, अवघ्या दहा ते बारा दिवसांवर गणेशोत्सव त्यापाठोपाठ बकरी ईद, नवरात्र, मुहर्रम, दसरा असे सर्वच सण साजरे केले जाणार आहेत. चालू महिन्यापासून तर नोव्हेंबरपर्यंत सणासुदीचा काळ असणार आहे. या पार्श्वभूमीवर वडाळागाव परिसरात कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. झोपडपट्टी परिसरात चोरीछुप्या पध्दतीने सुरू असलेले अवैध धंदे, सराईत गुन्हेगार, टवाळखोरांचा वाढता उपद्रव वेळीच रोखण्याची गरज असल्याचे त्रस्त नागरिकांनी
सांगितले. (प्रतिनिधी)