तलवारीने केक कापने पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:11 AM2021-07-21T04:11:41+5:302021-07-21T04:11:41+5:30
सटाणा : तालुक्यातील दरेगाव येथील युवकाच्या तलवारीने केक कापणे चांगलेच अंगाशी आले आहे. गर्दी जमवून तलवारीने केक कापून ...
सटाणा : तालुक्यातील दरेगाव येथील युवकाच्या तलवारीने केक कापणे चांगलेच अंगाशी आले आहे. गर्दी जमवून तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केल्या प्रकरणी जायखेडा पोलिसांनी ‘बर्थडे बॉय’वर गुन्हा दाखल केला आहे.
महेश दयाराम पवार (२०) रा. दरेगाव याने गुरुवारी आपल्या गावात स्वतःचा वाढदिवस करत तलवारीने केक कापला होता. या प्रकाराची गोपनीय माहिती जायखेड्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांना मिळाली असता त्यांनी पोलीस उपनिरीक्षक मिलिंद नवगिरे व त्यांच्या टीमला याबाबत चौकशी करण्यास सांगितले. पोलीस उपनिरीक्षक नवगिरे व त्यांच्या टीमने पवार याचे दरेगाव येथील घर गाठत चौकशी केली असता गुरुवारी सायंकाळी ०७.३० वा गावातच गर्दी जमवत प्रदर्शन केले. त्यानंतर तलवारीने केक कापला होता. ज्या तलवारीने केक कापला होता ती तलवार पोलिसांनी पवार याच्या घरातून ताब्यात घेतली आहे. याबाबत पोलीस शिपाई सुनीलसिंग बावरी यांनी जायखेडा पोलिसांत फिर्याद देत ‘बर्थडे बॉय’ महेश पवार याच्यावर विनापरवाना तलवार स्वत:जवळ बाळगून जिल्हाधिकारी यांचे जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केले. वाढदिवस साजरा करताना लोकांची गर्दी जमवून कोरोना नियमांचे व जिल्हाधिकारी नाशिक यांचे आदेशाचे उल्लंघन करून कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव पसरेल असे कृत्य केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.