सायकल ट्रॅक मार्ग बहरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:13 AM2021-04-05T04:13:30+5:302021-04-05T04:13:30+5:30
दुपारनंतर गल्लीतील दुकाने सुरू नाशिक : शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे प्रशासनाने आदेश ...
दुपारनंतर गल्लीतील दुकाने सुरू
नाशिक : शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे प्रशासनाने आदेश दिलेले आहेत. मात्र अंतर्गत रस्त्यावरील दुकाने दुपारनंतर सुरू राहत असून शासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले जात आहे. दुपारनंतर पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी अंतर्गत रस्त्यांवर फिरकत नसल्याचे दुकानदार सांगतात.
खासगी क्लासेस चोरीछुपे सुरूच
नाशिक : शाळा बंद असल्याने मुले शाळेत जात नसली तरी शहरात अनेक ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांची घरगुती शिकवणी सुरू असल्याचे बोलले जात आहे. कॉलनी, सोसायट्यांमध्ये खासगी घरगुती शिकवणी अनेक ठिकाणी चालते. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थी अशा शिकवणीला पाठविले जात आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची गरज आहे.
साेसायट्यांमध्ये निर्बंधाकडे दुर्लक्ष
नाशिक : शहरातील अनेक सोसायट्यांच्या प्रवेशद्वारांवर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून फलक लावण्यात आलेले आहेत. असे असतानाही अशा ठिकाणी या नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसते. लहान मुले आवारात खेळत असल्याचे तसेच विक्रेत्यांना सोसायट्यांमध्ये प्रवेश दिला जात असल्याने धोका अधिक वाढला आहे.
टाकळी रस्त्यावर पदपथाचे काम
नाशिक : टाकळी रस्त्यावरील दुभाजकांच्या कामाबरोबरच पदपथाचे कामही सुरू झाले आहे. या मार्गावर दोन्ही बाजूने पदपथावर पेव्हरब्लॉक टाकले जात असून रस्त्याचे सुशोभीकरण केले जात आहे. काही महिन्यांपूर्वी याच मार्गावर पदपथाचे काम करण्यात आले होते. आता जुने पेव्हरब्लॉक काढून नवीन टाकले जात आहेत.
दुभाजकाला पांढरा रंग असावा
नाशिक : टाकळी रोडवर लोखंडी दुभाजक उभारले जात आहे. येथील दुभाजकांना लवकरच रंगरंगोटीदेखील केली जाणार आहे. वाहनधारकांना रात्री आणि दिवसाही दुभाजक दृष्टीत पडावेत यासाठी दुभाजकांना पांढरा रंग देण्याची मागणी होत आहे. रात्रीच्या सुमारासही पांढरा रंग दिसत असल्याने या मार्गावरील अपघाताला आळा बसण्यास मदत होणार आहे.
फळविक्रेत्यांकडून नियमांचे उल्लंघन
नाशिक : हातगाडीवर फळविक्री करणाऱ्यांकडून नियमांचे उल्लंघन होतांना दिसत आहे. मास्क केवळ हनुवटीवर ठेवून ते ग्राहकांशी संवाद साधत असल्याने अशा विक्रेत्यांकडून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषत: हातागाडीवरील विक्रेत्यांकडून नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे.
उपनगर रस्त्याचे पालटले रूप
नाशिक : उपनगर येथील रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने या रस्त्याचे रूप पालटले आहे. या मार्गावर भरणाऱ्या बाजारामुळे येथील वर्दळ अधिकच वाढली आहे. रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने दुचाकीस्वार सुसाट वेगाने वाहने चालवीत असल्याने शांती पार्क तसेच टाकळी कॉर्नर येथे दुभाजक टाकण्याची मागणी होत आहे.