सायकलिंग परिक्रमा : नाशिक पोलीस आयुक्तालय-वायुसेनेचा संयुक्त ‘प्रयास’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 10:20 PM2018-03-04T22:20:16+5:302018-03-04T22:20:16+5:30
पोलीस आयुक्तालय व वायुसेना यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक-नागपूर-नाशिक अशी सायकल परिक्रमा आयोजित करण्यात आली होती. या परिक्र मेला २२ फेब्रुवारी रोजी आयुक्तालयातून प्रारंभ करण्यात आला.
नाशिक : वाहतूक नियमांच्या जनजागृतीसाठी पोलीस आयुक्तालय व देवळाली येथील वायूसेना केंद्राच्या वतीने ‘प्रयास सायकलिंग परिक्रमा’ हा संयुक्त उपक्रम राबविण्यात आला. याअंतर्गत दोन्ही दलाचे प्रत्येकी सहा सायकलपटूंनी मोहिमेत सहभागी होऊन १,६०० किलोमीटरचे अंतर यशस्वीरीत्या पूर्ण केले.
पोलीस आयुक्तालय व वायुसेना यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक-नागपूर-नाशिक अशी सायकल परिक्रमा आयोजित करण्यात आली होती. या परिक्र मेला २२ फेब्रुवारी रोजी आयुक्तालयातून प्रारंभ करण्यात आला. ११ दिवसांच्या या मोहिमेत १२ सायकलपटूंनी सुमारे १,६०० किलोमीटरचे अंतर यशस्वीरीत्या पूर्ण केले. या मोहिमेत वायुसेनेचे स्कॉर्डनप्रमुख संतोष दुबे, लेफ्टनंट सुमित, नितीन पाटील, सार्जेंट संजय, कॉरपोरल समीउल्ला, एस. जाधव, रविंदर, एअरक्राफ्टमॅन धीरज, सुमित, मनदीप यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक दीपक गिरमे, बाळकृष्ण वेताळ, नंदू उगले, सुदाम सांगळे, किरण वडजे, दिनेश माळी, हर्षल बोरसे, एम. धूम, संदीप भुरे, फुलचंद पवार हे सहभागी झाले होते.
मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात या सायकलिस्ट अधिकारी-कर्मचा-यांनी चांदवड येथील नेमिनाथ जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात रस्ता सुरक्षाविषयी माहिती देत तरुणाईचे प्रबोधन केले. तसेच वायुसेनेत भरती होण्यासाठी करावयाची तयारी व पात्रतेविषयीची माहिती दुबे यांनी दिली. प्रवासादरम्यान त्यांनी विविध महाविद्यालयांना भेटी देत गावपातळीवरील प्रमुख चौकांमध्ये थांबून नागरिकांचे रस्ता सुरक्षाविषयी प्रबोधन केले. शेगाव येथील गजानन महाराज देवस्थान परिसरात सायकलपटूंचा हा समूह तिसºया दिवशी दाखल झाला. सहाव्या दिवशी सायकलपटू नागपूर शहरातील सोनगाव वायुसेनेच्या केंद्रावर पोहचले. तेथे एअर व्हाइस मार्शल एम. सिंग यांनी सायकलपटूंच्या रॅलीला झेंडा दाखविला.
दहाव्या दिवशी सायकलपटूंचा समूह जालनावरून शिर्डीमार्गे औरंगाबाद पोलीस आयुक्तालयात पोहचला. अकराव्या दिवशी शिर्डी येथून सायकलपटू नाशिकच्या दिशेने रवाना झाले. सकाळी पावणेबारा वाजेच्या सुमारास सर्व सायकलपटूंचा रस्ता सुरक्षेविषयी प्रबोधनाचा ‘प्रयास’ पूर्णत्वास आला.