गॅसगळती होऊन सिलिंडरचा स्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 12:56 AM2021-01-05T00:56:22+5:302021-01-05T00:57:35+5:30
सिडको परिसरातील खुटवडनगर येथील धनदाई कॉलनीमध्ये असलेल्या एका बंगल्यात स्वयंपाकाच्या गॅसची रात्रीतून गळती झाल्याने, सोमवारी (दि.४) सकाळी सात वाजेच्या सुमारास स्फोट झाला. या स्फोटात घरातील पगार कुटुंबातील पाच व्यक्ती जखमी झाले आहेत. यामध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे.
नाशिक : सिडको परिसरातील खुटवडनगर येथील धनदाई कॉलनीमध्ये असलेल्या एका बंगल्यात स्वयंपाकाच्या गॅसची रात्रीतून गळती झाल्याने, सोमवारी (दि.४) सकाळी सात वाजेच्या सुमारास स्फोट झाला. या स्फोटात घरातील पगार कुटुंबातील पाच व्यक्ती जखमी झाले आहेत. यामध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे.
घटनेची माहिती मिळताच, सातपूर केंद्रातील अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्वरित पाण्याचा मारा करत लागलेली आग विझविली. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
खुटवडनगर येथील पगार कुटुंबातील पुष्पा पगार या सोमवारी नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजेच्या सुमारास आपल्या नातवाला पेज तयार करून देण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या. त्यांनी गॅस पेटविण्याचा प्रयत्न केला असता, घरात अगोदरच गॅसची गळती झालेली असल्याने मोठा स्फोट झाला.
हा स्फोट इतका भयानक होता की, घरातील दरवाजे खिडक्या आणि भिंतीदेखील तुटल्या. खिडक्यांची तावदाने थेट अंगणात येऊन पडली होती, तसेच घराबाहेर असलेल्या वाहनांच्याही काचा फुटल्या आणि आजूबाजूंच्या घरांनाही हादरे बसल्याचे रहिवाशांनी सांगितले.
या स्फोटात पुष्पा बळीराम पगार त्यांचे पती बळीराम पगार, तसेच मुलगा अतुल पगार, मुलगी अश्विनी पगार, तसेच नातू रोहन व रुची हे सर्व जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. काही दिवसांपूर्वी गॅस गिझरचा स्फोट होऊन युवक मृत्युमुखी पडला होता.
या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. गॅस सिलेंडर गळती होऊन झालेल्या दुर्घटनेमुळे इमारतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बाहेर उभ्या असलेल्या गाड्यांच्या काचा फुटल्या तर आजुबाजूच्या घरांमधील साहित्यांचे नुकसान झाले.