सिलिंडरची नोंदणी पुन्हा ठप्प

By admin | Published: February 3, 2015 01:37 AM2015-02-03T01:37:40+5:302015-02-03T01:38:01+5:30

सिलिंडरची नोंदणी पुन्हा ठप्प

The cylinders register again | सिलिंडरची नोंदणी पुन्हा ठप्प

सिलिंडरची नोंदणी पुन्हा ठप्प

Next

नाशिक : गॅस सिलिंडरचे शासकीय अनुदान थेट ग्राहकाच्या बॅँक खात्यात जमा करण्याच्या नादात भ्रमणध्वनीवरील लघुसंदेशाने गॅसची नोंदणी करण्यास अगोदर टाळाटाळ करणाऱ्या तेल कंपन्यांच्या छळापासून ग्राहक मुक्त होत नाही तोच, आता भारतीय दूरसंचारकडे ही सेवा वर्ग करण्यात आल्याने गेल्या चार-पाच दिवसांपासून सिलिंडरची नोंदणी पुन्हा ठप्प होऊन परिणामी त्याचा वितरणावरही परिणाम झाला आहे. या साऱ्या प्रकाराबाबत गॅस वितरकांनी कानावर हात ठेवल्यामुळे ग्राहक सैरभैर झाले आहेत.
नवीन वर्षापासून गॅस सिलिंडरचे शासकीय अनुदान बॅँक खात्यात जमा करण्याचा निर्णय पेट्रोलियम मंत्रालयाने घेऊन ज्या ग्राहकांचे बॅँकेत खाते आहे त्यांच्यासाठी ही योजना लागू करण्यात आली; मात्र हे करताना तेल कंपन्यांनी लघुसंदेशाद्वारे करण्यात येणारी गॅस नोंदणी बंद केली असून, त्यासाठी थेट भ्रमणध्वनीवर नोंदणी करण्याचा निर्णय घेतला.
विशेष करून भारत पेट्रोलियम कंपनीने आपल्या पूर्वीच्या गॅस नोंदणी पद्धतीत बदल केल्याने त्याचा फटका जानेवारी महिन्यात अनेक ग्राहकांना बसला व त्यातून अनेक तक्रारीही करण्यात आल्यानंतर कालांतराने यात सुसूत्रीकरण करण्यात आले. आता मात्र ग्राहकांना नोंदणीसाठी ज्या दूरध्वनी कंपनीचा भ्रमणध्वनी क्रमांक भारत पेट्रोलियम कंपनीने दिला आहे, ती दूरध्वनी कंपनीच बदलण्याचा निर्णय भारत पेट्रोलियम कंपनीने घेतला आहे. थोडक्यात सांगायचे तर पूर्वी आयडिया कंपनीच्या भ्रमणध्वनीवर नोंदणी केली जात होती, आता तेल कंपनीने हेच काम भारत दूरसंचार निगमला सोपविण्याचे ठरविले आहे. त्यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून भारत दूरसंचारच्या नेटवर्कमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे भ्रमणध्वनीवरून संपर्क साधणाऱ्या ग्राहकांची सिलिंडर नोंदणी ठप्प झाली आहे. यासंदर्भात तक्रारकर्त्या ग्राहकाला कोणी वालीच नसून, गॅस वितरकांनी तेल कंपनीकडे अंगुलीनिर्देश करून आपली मान सोडवून घेतली आहे, तर तेल कंपन्यांच्या प्रतिनिधींनीही सोयिस्कर मौन पाळल्याने गॅस वितरणावरही त्याचा परिणाम झाला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The cylinders register again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.