दारणाकाठी बिबट्या
By admin | Published: October 1, 2016 01:08 AM2016-10-01T01:08:25+5:302016-10-01T01:09:41+5:30
घबराट : राहुरीसह अनेक गावांमध्ये बिबट्याचा संचार
भगूर : गेल्या काही दिवसांपासून भगूरसह परिसरातील गावांमध्ये बिबट्याचे दर्शन घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दारणा नदीकाठच्या परिसरात बिबट्या वावरत असून, आतापर्यंत गायी आणि कुत्र्यांना बिबट्याने भक्ष्य केले आहे.
ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेक ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठसे शेतात दिसून येत असल्याने त्या ठिकाणी शेतमजूर कामाला जाण्यासाठी टाळाटाळ करत आहे. राहुरी येथील कस्तरे मळ्यात बुधवारी रात्री बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करून फस्त केल्याचे गुरुवारी सकाळी रहिवासी व ग्रामस्थांच्या लक्षात आले. यामुळे दारणा नदी किनारी असलेल्या ग्रामीण भागात, मळे परिसरातील शेतकरी, महिला, शेतमजूर आदिंमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी या परिसरात त्वरित पिंजरा लावावा, अशी मागणी भगूर शिवसेना शहरप्रमुख अंबादास कस्तुरे, उत्तम करंजकर, दयाराम कस्तुरे, अंबादास आडके, गोरख जाधव, नामदेव करंजकर, नारायण करंजकर, गोटीराम मांडे, रामदास करंजकर, बी. डी. करंजकर, बुधाजी पानसरे, देवीदास जाधव, गणेश करंजकर आदि शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)