दाभाडी येथे आगीत दोन दुकाने खाक
By admin | Published: May 11, 2017 12:43 AM2017-05-11T00:43:10+5:302017-05-11T00:43:20+5:30
गिसाका : दाभाडी येथे मंगळवारी रात्री शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सुखधन आॅटोमोबाइल व सुखधन इलेक्ट्रिकल्स अॅण्ड पावर हाऊस ही दुकाने खाक झाली .
लोकमत न्यूज नेटवर्क
गिसाका : मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथे मंगळवारी रात्री शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सुखधन आॅटोमोबाइल व सुखधन इलेक्ट्रिकल्स अॅण्ड पावर हाऊस ही दुकाने खाक झाली यात सुमारे पंचवीस ते तीस लाखांचे नुकसान झाले.
रात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास वीजवाहिनीतील बिघाडामुळे शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत येथील विनोद निंबा महाले यांचे सुखधन आॅटोमोबाइल्स अॅण्ड स्पेअर पार्ट्स व तुषार महाले यांचे सुखधन इलेक्ट्रिकल्स अॅण्ड पावर हाउस ही दुकाने जुळून खाक झाली. दुकानांतून धुराचे लोळ बाहेर पडल्याने आग लागल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी पाण्याच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र यश आले नाही. शेवटी मालेगाव येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविता आले. आगीत आॅटोमोबाइल दुकानातील फर्निचर, दोन मोटारसायकल, रॅक, टायर ट्यूब, बॅटऱ्या, गिअर आॅइल, पम्प, ग्रीस डबे, एअर कॉम्प्रेसर, हेड टूल्स, बॅटरी चार्जर यांसह बिल बुक व स्पेअर पार्टचे जवळपास पंधरा ते वीस लाखांचे नुकसान झाले, तर इलेक्ट्रिकल्स दुकानातील फर्निचर, सर्व इलेक्ट्रिक वस्तू जळून खाक होऊन पंधरा लाखांचे नुकसान झाले. पोलीसपाटील कारभारी निकम, तलाठी पी.पी. मोरे, उपनिरीक्षक सारंग चव्हाण यांनी पंचनामा केला.