दासनवमीनिमित्त टाकळीत रंगले गीतगायन
By admin | Published: February 21, 2017 12:51 AM2017-02-21T00:51:20+5:302017-02-21T00:51:35+5:30
दासनवमीनिमित्त टाकळीत रंगले गीतगायन
नाशिक / उपनगर : समर्थ रामदास स्वामी यांची तपोभूमी असलेल्या आगर टाकळी येथील श्री मारुती देवस्थान आणि राष्ट्रसंत रामदास स्वामी मठ यांच्या वतीने दासनवमीनिमित्त भक्तिगीत, संगीत, भजन, व्याख्यान आदिंसह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. दासनवमीनिमित्त येथील मंदिरांत भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.
संत रामदास स्वामी यांनी वयाच्या १२व्या वर्षापासून एक तपापर्यंत आगर टाकळीत वास्तव्य करून तपश्चर्या केली होती. तसेच येथे शेणापासून बनविलेल्या मारुतीची स्थापन केली होती. त्यामुळे या तीर्थक्षेत्राला महत्त्वाचे स्थान असून, माघ वद्य नवमीला रामदास पुण्यतिथीनिमित्त आगर टाकळी येथे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सकाळी ६ ते ९ संस्थानचे अध्यक्ष जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. के. ब्रह्मे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. त्यानंतर ९ ते १०.३० पर्यंत चारूदत्त दीक्षित व कलाकारांच्या ‘दास रामाचा हनुमंत नाचे’ हा भक्तिगीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच गायक विजय भट यांचा भक्ती संगीताचा कार्यक्रम झाला. दुपारी १२.३० वाजता महाआरती करण्यात येऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दुपारी १ ते २ पर्यंत मृणाल जोशी यांचे भक्तीकार्य या विषयावर प्रवचन झाले. त्यानंतर स्वामीनारायण भजनी मंडळाचे भजन गायन रंगले. दुपारी ३ ते ५ या वेळात समर्थ रामदास चरित्र गीत गायन झाले. सायंकाळी ५ ते ६ या वेळात एस. के. कुलकर्णी यांचे सत्य धर्म वेद उपासना आणि समर्थांची शिकवण या विषयावर व्याख्यान झाले. सायंकाळी ६ वाजता प्रमोद दत्त यांचे गिरणार पर्वत प्रदक्षिणा विषयावर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी ब्रह्मा व्हॅली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूराव देसाई होते. दासनवमीनिमित्त गर्दी झाली होती. याप्रसंगी संस्थानचे विश्वस्त सुधीर शिरवाडकर, ज्योतिराव खैरनार, प्रकाश पवार, दिलीप कैचे, विजया माहेश्वरी, देशपांडे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘दास रामाचा हनुमंत नाचे’ ...
‘दास रामाचा हनुमंत नाचे’, ‘रामचंद्र स्वामी माझा’, ‘कौशल्येचा राम बाई’ या आणि अशा विविध भक्तिगीतांचे सादरीकरण रामदासनवमी निमित्त आयोजित संगीत मैफलीचे आगरटाकळी येथील समर्थ रामदास स्वामी मठात सोमवारी (दि. २०) या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. उमटली रामाची पाऊले, अंजनीच्या सुता, नाचत गाचत गावे, अद्भुत लीला परमेश्वराची आदि गीते सादर करण्यात आली. कार्यक्रमाची सुरूवात चारुदत्त दीक्षित यांनी गायलेल्या ‘जय जय जय हे समर्थ रामदास’ या स्तवनाने झाली. संगीत मैफल उत्तरोत्तर रंगत असताना ‘अद्भुत लीला परमेश्वराची’ तसेच मानवाच्या जीवनशैलीवर आधारित ‘कशासाठी आटापिटा’ या गाण्यांनी रसिकांची मने जिंकली. यावेळी चारुदत्त दीक्षित (संवादिनी), सुधीर करंजीकर (तबला), साक्षी झेंडे (इतर तालवाद्ये) यांनी साथ संगत केली. यावेळी राजेंद्र सराफ, मृदुला पिंगळे या गायकांनी सहगायन केले. यावेळी राजेंद्र सराफ यांनी गायलेल्या ‘स्वामी कृपा कधी करणार’ या भैरवीने या मैफलीची सांगता झाली.