दहिकुटे, बोरीअंबेदरी लाभक्षेत्र सिंचनाखाली आणणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:15 AM2021-03-14T04:15:13+5:302021-03-14T04:15:13+5:30
शासकीय विश्रामगृहात दहिकुटे व बोरीअंबेदरी प्रकल्पाच्या अनुषंगाने पाटबंधारे विभागासह कृषी विभाग व लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसमवेत आढावा बैठकीत मंत्री भुसे बोलत ...
शासकीय विश्रामगृहात दहिकुटे व बोरीअंबेदरी प्रकल्पाच्या अनुषंगाने पाटबंधारे विभागासह कृषी विभाग व लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसमवेत आढावा बैठकीत मंत्री भुसे बोलत होते. भुसे म्हणाले, पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवून शेतशिवारातील सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून, दहिकुटे प्रकल्पातील लाभक्षेत्रात येणाऱ्या ६४८ हेक्टर क्षेत्रापैकी आजपर्यंत केवळ २२३ हेक्टर इतकेच क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. त्याचे ५० टक्के सुध्दा उद्दिष्ट पूर्ण होत नाही, तर बोरीअंबेदरी प्रकल्पातील लाभक्षेत्रात येणाऱ्या ९१० हेक्टर क्षेत्रापैकी आतापर्यंत केवळ २५० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आल्याने त्याचे उद्दीष्ट ३० टक्क्यापेक्षा अधिक नसल्याने या दोनही प्रकल्पातील लाभक्षेत्र पूर्ण क्षमतेने सिंचनाखाली आणण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतंर्गत या लाभक्षेत्रामध्ये शेततळे व फळबाग लागवड करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या, तर लाभक्षेत्रातील पाण्याचा कार्यक्षमतेने वापर होण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करण्याचे आवाहन भुसे यांनी केले.
इन्फो
अर्ज सादर करण्यास मुदतवाढ
महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्यास दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून, दहिकुटे व बोरीअंबेदरी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांनी फळबाग लागवड, शेततळे व ड्रिप प्रकल्पावर लक्ष केंद्रित करून येत्या दोन दिवसांत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन भुसे यांनी केले आहे