नाशकात प्रतिदिनी होणारी कोरोनाबाधितांची वाढ चिंताजनक !

By किरण अग्रवाल | Published: June 13, 2020 10:38 PM2020-06-13T22:38:38+5:302020-06-14T01:38:12+5:30

मालेगावमधील कोरोनाची स्थिती आटोक्यात येत असताना नाशकातील बाधितांची वाढती संख्या धडकी भरवणारी आहे. नागरिकांची निर्धास्तता तर यामागे आहेच, पण ‘तुम्हीच तुमचे बघून घ्या’ अशा मानसिकतेतून हतबलपणे प्रशासकीय यंत्रणांनीही अंग काढून घेतलेले दिसत असल्याने दिवसेंदिवस संकट गडद होऊ पाहत आहे.

The daily increase in the number of coronaries in Nashik is worrying! | नाशकात प्रतिदिनी होणारी कोरोनाबाधितांची वाढ चिंताजनक !

नाशकात प्रतिदिनी होणारी कोरोनाबाधितांची वाढ चिंताजनक !

Next
ठळक मुद्देशासकीय यंत्रणेत समन्वयाची गरज, नागरिकांकडूनही निर्धास्तता टाळण्याची अपेक्षा

सारांश।
सावधानता ही बाळगायलाच हवी, अन्यथा बेसावधपणा हा अपघाताला निमंत्रण देणारा ठरतो हे कोरोनाविषयक नाशकातील सद्यस्थितीने पुन्हा स्पष्ट करून दिले आहे. सुरक्षित म्हणता म्हणता कोरोनाने नाशकात ज्या पद्धतीने हातपाय पसरणे चालविले आहे ते पाहता चिंता वाढून गेली असून, राज्यात हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावपेक्षाही वर्तमान स्थितीत नाशकात बाधितांची संख्या अधिक आढळू लागल्याने यासंबंधातील भय गडद झाले आहे.

कोरोनासोबत जगणे ही यापुढील काळाची अपरिहार्यता राहणार असल्याने लॉकडाऊनमधून बाहेर पडून उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने पुनश्च हरिओम करण्यात आला आहे, पण तसे होताना नागरिकांकडून जी काळजी घेतली जावयास हवी ती घेतली जात नसल्याने कोरोनापासून दूर होण्याची शक्यताही दिवसेंदिवस धुसर होतानाच दिसत आहे. नाशिक जिल्ह्याच्या संदर्भाने विचार करायचा झाल्यास मालेगाव शहर राज्यात हॉटस्पॉट ठरले होते, परंतु अलीकडील काही दिवसात तेथील परिस्थिती पूर्णपणे बदलताना दिसत असून, आतापर्यंत ज्या नाशकात भय मुक्तीचे वातावरण होते तेथे मात्र बाधितांची व बळी पडणाऱ्यांचीही संख्या वाढू लागल्याने चिंतेचे ढग दाटून येणे स्वाभाविक ठरून गेले आहे.

आकडेवारीच द्यायची तर सद्यस्थितीत मालेगावमध्ये शंभराच्या आत बाधित रुग्ण उपचार घेत असताना, नाशिक शहरात हीच संख्या सुमारे ३०० वर पोहोचली आहे. म्हणजे रुग्ण संख्येच्या दृष्टीने नाशिकने मालेगावला मागे टाकले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रुग्ण दुपटीने होण्याचा वेग चौदा दिवसांचा असताना नाशकात तो अवघ्या आठवड्यावर म्हणजे सात दिवसांवर आला आहे. अलीकडच्या काही दिवसातील आकडे बघितले तर प्रतिदिनी २५ पेक्षा अधिक बाधितांचा आकडा नाशकात समोर येताना दिसत आहे. पूर्ण बरे झालेल्या रुग्णांची टक्केवारी बघता मालेगावमध्ये ती ८३ टक्के असताना नाशकात मात्र ४० टक्केच आढळून येते आहे. सुरुवातीच्या काळात जुने नाशिक, वडाळा गाव, बागवानपुरा, अंबड परिसर अशा मोजक्या परिसरात आढळून येणारे रुग्ण आता हळूहळू शहराच्या सर्वच भागात आढळू लागले आहेत. त्यामुळे कोरोनाची नाशकातील वाढती सार्वत्रिकता लक्षात यावी. हीच स्थिती चिंतेत भर घालणारी ठरली आहे.

कुठे गडबड होते आहे याचा विचार यानिमित्ताने करणे गरजेचे झाले आहे. बाधित आढळणा-याचा परिसर सील करण्यात कुचराई होते आहे, की बाजारपेठा व व्यवहार सुरळीत करण्यासाठी केल्या गेलेल्या अनलॉकमधून संसर्ग वाढतो आहे; याचा शोध घेऊन तातडीने उपाययोजना केल्या जाणे गरजेचे बनले आहे. शासकीय यंत्रणांमधील समन्वयाचा भाग यात महत्त्वाचा आहे. साधे अनलॉक अंतर्गत दुकाने बंद करण्याच्या टाइमिंगवरूनच जो गोंधळ उडालेला दिसून आला तो यासंदर्भात पुरेसा आहे. बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी दूर करण्यासाठी जिल्हा, महापालिका व पोलीस प्रशासनाने एकत्र बसून दुकानांच्या वेळा रात्री नऊ वाजेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला असताना पहिल्याच दिवशी पाच वाजेनंतर दुकाने सुरू ठेवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याची भाषा केली गेली त्यामुळे व्यावसायिकांत नाराजी व गोंधळ उडाला. सम व विषम पद्धतीने दुकाने उघडण्याचे ठरविले गेले, परंतु त्याच्या अंमलबजावणीतही अनेक समस्या येताना दिसत आहेत. रविवार कारंजावर भाजी विक्रेत्यांना हा नियम लावला जातो, परंतु बिनधास्तपणे नियमभंग करणा-यांकडे दुर्लक्ष होताना दिसते. बाहेरगावाहून येणारे प्रवासी व वाहनांची तर कुठेच, कसलीच विचारपूस होताना दिसत नाही. मग बाधितांचे ट्रेसिंग होणार कसे? पण नागरिकच ऐकत नाही म्हणत यंत्रणांनी त्यांच्यापुढे हात टेकल्यागत आता ‘रामभरोसे’ सोडून दिल्याचे चित्र दिसून येत आहे. परिणामी कोणी कुणाला रोखणारा किंवा टोकणाराच दिसत नाही. सा-या ठिकाणी सारे काही सुखेनैव सुरू आहे.

महत्त्वाचे म्हणजे, नाशकात कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता बाजारपेठा व व्यवहार सुरू झाले असले तरी नागरिकांनीही स्वत:हून दक्षता घेणे आवश्यक आहे, परंतु तेच होताना दिसत नाही. मर्यादित कालावधीमुळे बाजारपेठात उसळणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने दुकानांची मुदत रात्री नऊ वाजेपर्यंत वाढवून दिली आहे. अन्यही निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत, परंतु नागरिक अजूनही गर्दी करतानाच व बेफिकीरपणे वावरताना दिसत आहेत. हीच बाब कोरोनाला निमंत्रण देणारी ठरू पाहते आहे. निर्धास्ततेतून अपघात घडतो याची प्रचिती यातून येताना दिसत आहे. हा अपघात टाळायचा असेल तर केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता नागरिकांनीही स्वत:ची काळजी घेतलेली बरी.

 

 

Web Title: The daily increase in the number of coronaries in Nashik is worrying!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक