रोजंदारी आदिवासी तरुण कमावू लागला लाखो रुपये !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 05:43 PM2020-07-13T17:43:06+5:302020-07-13T17:44:29+5:30
नाशिक : दुसऱ्याच्या शेतात रोजावर काम करणा-या आदिवासी तरुणाने मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन आणि कृषी विभागाच्या योजनांचा आधार घेऊन आपली प्रगती साधली असून, आपल्या मेहनतीच्या जोरावर आज त्याला २० गुंठे क्षेत्रातून वर्षाकाठी पाच ते सहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.
नाशिक: दुसऱ्याच्या शेतात रोजावर काम करणा-या आदिवासी तरुणाने मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन आणि कृषी विभागाच्या योजनांचा आधार घेऊन आपली प्रगती साधली असून, आपल्या मेहनतीच्या जोरावर आज त्याला २० गुंठे क्षेत्रातून वर्षाकाठी पाच ते सहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.
त्र्यंबकेश्वर या आदिवासी तालुक्यातील साप्ते गावातील किशोर पवार या आदिवासी तरुणाने ही किमया साधली आहे. मूळचा तालुक्यातीलच देवडोंगरा येथील रहिवासी असलेल्या किशोरच्या घरची स्थिती बेताची असतानाही त्याने मुक्त विद्यापीठातून बीएस्सी अॅग्रीची पदवी मिळविली. वडील मुक्त विद्यापीठात रखवालदार म्हणून नोकरीस असताना त्यांच्याकडून त्यांना कृषी विज्ञान केंद्राची आणि तेथे चालणा-या अभ्यासक्रमाची माहिती मिळाली. याठिकाणी त्याने नर्सरी ट्रेनिंगसाठी प्रवेश घेतला या अभ्यासादरम्यान विविध ठिकाणी भेटी दिल्या. नर्सरीची माहिती घेतली. यानंतर बरेच दिवस तो गिरणारे येथील एका नर्सरीत रोजाने कामही करत होता. नर्सरीची माहिती मिळाल्यानंतर आपण स्वत:च काहीतरी करावे या उद्देशाने त्याने सुरुवातीला साप्ते येथे २० गुंठे क्षेत्रावर साध्या लाकडी बल्ल्या आणि हिरवी जाळी वापरून नर्सरी सुरू केली. परिसरात नर्सरी नसल्यामुळे त्याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला यातून त्याचाही उत्साह वाढला. पाण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रथम त्याने शेततळ्याची निर्मिती केली. त्यानंतर परिसरातील हवामानाचा विचार करून टनल पॉलहाउस उभे केले. यासाठी कृषी विभागाकडून त्याला ६ लाख रुपयांचे अनुदान मिळाले. काही बॅँकेचे कर्ज उचलून खर्चाची तोंड मिळवणी केली. या पॉलीहाउसमध्ये सध्या किशोर विविध भाजीपाल्यांची रोपे तयार करतो. त्याला परिसरातील शेतक-यांकडून चांगली मागणी आहे. यामुळे अल्पावधीतच त्याची भरभराट झाली.