नीचांकी दरामुळे दुग्ध व्यवसाय अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:11 AM2021-07-10T04:11:12+5:302021-07-10T04:11:12+5:30
पांगरी : शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दुधाला प्रतिलीटर किमान २३ ते २४ ...
पांगरी : शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दुधाला प्रतिलीटर किमान २३ ते २४ रुपयेदेखील दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भागत नसल्याचे चित्र आहे. यामुळे तालुक्यातील दुग्ध व्यवसाय संकटात सापडण्याची चिन्हे आहेत.
ग्रामीण भागात शेतीपूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन व दुग्ध व्यवसायाची निवड शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र, सध्या दुधाचे दर २५ रुपयांपेक्षाही कमी म्हणजे सुमारे २२ ते २४ रुपये इतका नीचांकी आहे. त्यामुळे हा व्यवसाय करणे परवडेनासे झाले आहे. गेल्या एक वर्षापासून दुधाच्या दरात सतत घसरण होत आहे. दुधाचे दर कमी झाल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सध्याची या व्यवसायाची वस्तुस्थिती लक्षात घेता दुधाचा उत्पादन खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे. सध्या तरी ‘दूध स्वस्त, पाणी महाग’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.
दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस झाल्याने दोन वर्षांपासून खासगी टँकरचे विकत पाणी तसेच बाहेरगावावरून चारा आणावा लागत नसला तरी दूधवाढीसाठी अनेक प्रकारचे औषध, ढेप, सरकी, यासारख्या खाद्यवस्तू शेतकऱ्यांना खरेदी कराव्या लागतात. सरकीच्या ५० किलो पोत्याचा दर १८००, तर कांडीच्या ५० किलो पोत्याच्या दर १४०० रुपयांपर्यंत आहे. एका गाईला सरकीचे एक पोते साधारण ६ ते ८ दिवस पुरते. त्यात गाईचा दवाखाना, बाकी खर्च विचारात घेता उत्पादन खर्चही निघत नसल्याचे शेतकरी सांगतात.
कोट....
दूध खरेदी व दूध पिशवी विक्रीमध्ये असणारी तफावत दूर होणे गरजेचे आहे. तसेच दुधाला प्रतिलीटर ३० ते ३५ रुपयांच्या पुढे भाव मिळणे गरजेचे असून, गेल्या वर्षभरात दुधाच्या भावात सातत्याने घसरण झाली आहे. ही घसरण कायम राहिली, तर शेतकऱ्यांना जोडधंदा बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. तसेच दुधाबरोबर शेतमालालाही चांगला भाव मिळून स्वामीनाथन आयोग लागू केला पाहिजे.
-आत्माराम पगार, तालुका अध्यक्ष, स्वाभिमानी संघटना
कोट....
दोन ते तीन वर्षांपासून दुधाचे भाव वाढलेले नाहीत. परंतु दुधवाढी लागणाऱ्या वस्तूंचे भाव दुपटीने वाढले आहेत. सध्यातरी २२ रुपये दर पडत आहे. तोच दर सुमारे ३० रुपयेपर्यंत गेला तर दुग्ध व्यवसाय परवडेल. नाहीतर शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय बंद करावा लागेल.
- बाबासाहेब शिंदे, शेतकरी