शॉर्टसर्किटमुळे डाळींबबाग खाक
By admin | Published: April 6, 2017 01:16 AM2017-04-06T01:16:20+5:302017-04-06T01:16:41+5:30
भेंडाळी (ता. निफाड) येथील शेतकरी रघुनाथ कमानकर यांच्या गहू लावलेल्या शेतात लागलेली आग डाळींबबागेला लागून नुकसान झाले
सायखेडा : भेंडाळी (ता. निफाड) येथील शेतकरी रघुनाथ सावळीराम कमानकर यांच्या गहू लावलेल्या शेतात (गट नंबर ४३७) वीजतारांच्या शॉर्टसर्किटमुळे बुधवारी (दि. ५) दुपारी २ वाजेच्या सुमारास लागलेली आग शेजारीच असलेल्या त्यांच्याच डाळींबबागेला लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. याच भागात सात वर्षांपूर्वी तारा तुटल्याने पहाटे घरातून बाहेर पडलेल्या वैशाली विष्णू कमानकर या विवाहितेचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून या परिसरातील तारा ‘जैसे थे’ आहेत. आज पुन्हा एकदा तसाच प्रकार घडल्याने शेतकरी संतापले आहेत.
कमानकर यांनी आपल्या एक एकर शेतात डाळींब पिकाची लागवड केली असून, पाण्याची टंचाई असल्याने मोठ्या मेहनतीने डाळींब पीक चांगल्या प्रकारे आले. मात्र काल शॉर्टसर्किटमुळे कापलेल्या गव्हाच्या पिकाला लागलेली आग पसरत जाऊन शेजारीच असलेल्या डाळींबबागेला लागली व या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विजेचा लोळ पडलेल्या शेतातील गव्हाची कापणी केलेली असल्याने मोठी आर्थिक हानी टळली. या ठिकाणी वीज वितरणचे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी भेट देत पंचनामा केला. ऐन दुष्काळात चार वर्षांपासून पोटच्या मुलाप्रमाणे कमानकर यांनी सांभाळलेली डाळींबबाग वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे डोळ्यासमोर आगीत भस्मसात झाल्याने शेतीचे कर्ज कसे फेडणार, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. (वार्ताहर)