खाद्य निगम महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2022 11:53 PM2022-03-16T23:53:50+5:302022-03-16T23:55:11+5:30
मनमाड : शहरातील भारतीय खाद्य निगम महामंडळामध्ये विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी देत धरणे आंदोलन केले. गेल्या ७ मार्चरोजी जेवणाच्या सुटीमध्ये संबंधित प्रशासनाविरोधात कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केली होती.
मनमाड : शहरातील भारतीय खाद्य निगम महामंडळामध्ये विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी देत धरणे आंदोलन केले. गेल्या ७ मार्चरोजी जेवणाच्या सुटीमध्ये संबंधित प्रशासनाविरोधात कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केली होती.
औरंगाबाद विभागातील चार अधिकाऱ्यांच्या निलंबनावरून अन्न महामंडळातील डेपोतील प्रदेश स्तरावरील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. हे अधिकारी कोणत्याही दोषाशिवाय निलंबित आहेत. औरंगाबाद डेपोत रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांचे पहिले वेतन अद्याप मिळालेले नाही. या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अधिकाऱ्यांवरील निलंबनाची कारवाई तातडीने मागे घ्यावी, ही आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी आहे. व्यवस्थापनाच्या या नकारात्मक वृत्तीने अन्न महामंडळाच्या महाराष्ट्र विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. औरंगाबादमधील निलंबित कर्मचाऱ्यांची कारवाई तात्काळ रद्द करावी, चार्जशिट मागे घ्यावे, सर्व विभागीय कार्यालयांमध्ये प्रलंबित ओव्हरटाईमचे पेमेंट तात्काळ देण्यात यावे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
भारतीय खाद्य निगम कर्मचारी संघाचे विभागीय अध्यक्ष पी. आर. दाती, मनमाड शाखेचे अध्यक्ष अनंत महाजन, सेक्रेटरी अजय राऊळ यांच्या नेतृत्वाखाली येथील भारतीय अन्न महामंडळ गोदामातील अधिकारी आणि कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते .