जिल्ह्यातील धरणसाठा निम्म्यावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:25 AM2021-03-04T04:25:46+5:302021-03-04T04:25:46+5:30

गेल्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणे हाऊसफुल्ल झाली होती. त्यामुळे नदी, नाल्यांमध्ये पाणी सोडून देण्याची वेळ आली ...

Dam stock in the district halved! | जिल्ह्यातील धरणसाठा निम्म्यावर !

जिल्ह्यातील धरणसाठा निम्म्यावर !

Next

गेल्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणे हाऊसफुल्ल झाली होती. त्यामुळे नदी, नाल्यांमध्ये पाणी सोडून देण्याची वेळ आली होती. पावसाळा संपुष्टात आल्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाने दणका दिल्यामुळे धरणाच्या पाण्यावरचे अवलंबित्व कमी झाले. परिणामी पाण्याची मागणी घटली. परंतु जिल्ह्यातील काही भागात रब्बीची पिके घेतली जात असल्यामुळे त्यांच्यासाठी आवर्तन सोडावे लागले. पिण्याच्या पाण्याचे आरक्षण जाहीर झाल्याने त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी साठवून ठेवण्यात आले आहे. जानेवारी व फेब्रुवारीत काही प्रमाणात सिंचनासाठी पाणी सोडण्यात आल्याने मार्चच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ५९ टक्के इतका जलसाठा शिल्लक असून, मार्चच्या शेवटच्या आठवड्यात व एप्रिलमध्ये बहुतांश धरणांमधून उन्हाळी आवर्तन सोडावे लागणार आहे. गेल्या वर्षी हाच जलसाठा ६९ टक्के इतका होता.

पावसाळ्यात मराठवाड्यासाठी गंगापूर धरणातून द्यावे लागते, त्यापेक्षाही अधिक पाणी जायकवाडीसाठी यापूर्वीच सोडण्यात आल्याने यंदा मराठवाड्याला जिल्ह्यातील धरणांमधून पाणी देण्याची गरज नसल्याचे पाटबंधारे खात्याचे म्हणणे आहे. मात्र, दारणा धरणावर नगर जिल्ह्याचाही हक्क असल्यामुळे नजीकच्या काळात निफाड, सिन्नर, कोपरगाव, राहता, श्रीरामपूरसाठी पाणी सोडावे लागणार आहे. परंतु दारणातील ९१ टक्के जलसाठा पाहता पाण्याची फारशी टंचाई भासणार नाही. सध्या गंगापूर धरण समुहात ५६ टक्केच जलसाठा असून, त्यातून नाशिक शहराबरोबरच औष्णिक विद्युत प्रकल्प, रेल्वे, औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवठा केला जातो. मात्र, गेल्या वर्षीपासून इगतपुरी तालुक्यातील मुकणे धरणातून नाशिक महापालिकेला पाणी पुरवठा होऊ लागल्यामुळे गंगापूर धरणावरील पाण्याचा ताण काही प्रमाणात कमी झाला आहे. असे असले तरी, यंदा मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच उन्हाचा तडाखा वाढला. त्यामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन झपाट्याने होण्याची शक्यता असून, परिणामी ग्रामीण भागात पाणी टंचाई भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, उपलब्ध जलसाठा पाहता पाटबंधारे खात्याने ही शक्यता फेटाळून लावली आहे.

चौकट===

जिल्ह्यातील धरणातील जलसाठ्याचे सिंचन व पिण्यासाठीचे आरक्षण यापूर्वीच करण्यात आले आहे. उन्हाचा कडाका व गळती याचा सारासार विचार करून पाण्याचे नियोजन योग्य असून, जुलैअखेर पिण्यासाठी पाणी पुरेल, यात शंका नाही.

- अलका अहिरराव, अधीक्षक अभियंता, पाटबंधारे

Web Title: Dam stock in the district halved!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.