जिल्ह्यातील ४० टक्के द्राक्षबागांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 11:20 PM2020-02-07T23:20:38+5:302020-02-08T00:02:06+5:30
नाशिक : द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात यावर्षी झालेला अतिपावसामुळे ४० टक्केबागांचे नुकसान झाले आहे. पावसानंतर सध्या पडत ...
नाशिक : द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात यावर्षी झालेला अतिपावसामुळे ४० टक्केबागांचे नुकसान झाले आहे. पावसानंतर सध्या पडत असलेल्या अतिथंडीमुळेही द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्याचा उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. निर्यातक्षम असलेल्या रंगीत द्राक्षांना युरोपात सध्या चांगला दर मिळत असला तरी शेतकऱ्यांकडे मालच नसल्याची माहिती महाराष्टÑ राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले यांनी दिली.
जिल्ह्यात पावणेदोन लाख एकरावर द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते, तर राज्यात साडेतीन लाख एकर क्षेत्र द्राक्ष पिकाखाली आहे. सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये आलेल्या पावसामुळे सटाणा भागातील अर्ली द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचा द्राक्षनिर्यातीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून, मागील वर्षी आतापर्यंत १४०० कंटेनर माल परदेशात गेला होता. यावर्षी मात्र आतापर्यंत १०५०-१०७० कंटेनरच गेले असल्याचे त्यांनी सांगितले. पावसाचा द्राक्ष उत्पादनावरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून, ज्या बागांपासून ६ ते १० टनापर्यंत उत्पादन मिळते त्याच द्राक्षबागांपासून आज केवळ २ ते ३ टन माल निघत आहे. यावर्षी निर्यातक्षम द्राक्षाला चांगला दर मिळत आहे. युरोपात पाठविल्या जाणाºया पांढºया द्राक्षांना ८५ ते ९५ रुपये किलो, तर रंगीत द्राक्षांना १०५ ते १२० रुपये किलोपर्यंत दर मिळत आहे. मात्र शेतकºयांकडे हा मालच शिल्लक राहिलेला नाही. यामुळे निर्यातक्षम बागांच्या नोंदणीची संख्याही पाच ते सहा हजाराने कमी झाली असून, यावर्षी फक्त ३१ हजार शेतकºयांनी नोंदणी केली आहे, असे ते म्हणाले.
सध्या पडत असलेल्या थंडीचाही द्राक्षांवर परिणाम होत असून, थंडीमुळे क्रॅकिंगचे प्रमाण वाढले आहे. यामुळे फवारणीचे प्रमाण वाढल्याने शेतकºयांचा उत्पादन खर्चही वाढला आहे. थंडीमुळे द्राक्ष मण्यांच्या आकारावरही परिणाम झाला आहे. नाशिक जिल्ह्यात नुकसानीचे प्रमाण अधिक असून, त्या तुलनेत सांगली, सोलापूर भागात नुकसान कमी आहे. त्या भागात छाटणी उशिरा होत असल्याने तेथील बागांना तसा फारसा धोका झाला नाही, अशी माहिती भोसले यांनी दिली.
शेतकरी झाले सतर्क
बदलत्या वातावरणामुळे द्राक्षबागांवर मोठ्या प्रमाणात फवारणी करावी लागत आहे. फवारणीचे प्रमाण वाढले तरी द्राक्षांमध्ये केमिकलचे प्रमाण काहीच जाणवत नाही. यावरून द्राक्ष उत्पादक शेतकरी किती सतर्क झाले आहेत याची प्रचिती येते, असे भोसले यांनी सांगितले.